वादळी पावसाने पडलेल्या वृक्षांना वाली नाही

By admin | Published: May 18, 2016 12:57 AM2016-05-18T00:57:22+5:302016-05-18T00:57:22+5:30

‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही

There is no wind in rainy season | वादळी पावसाने पडलेल्या वृक्षांना वाली नाही

वादळी पावसाने पडलेल्या वृक्षांना वाली नाही

Next


पुणे : ‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही. असा एखादा वृक्ष रहदारीच्या रस्त्यावर पडला तर त्याचा पसारा बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी कोणाची यावरून पालिकेच्या अग्निशमन दल व उद्यान विभागात वाद होतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात फिरून पाहणी करून धोकादायक वृक्षांची नोंद करण्याचा नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंदाही पालिकेकडे अशी कोणतीही नोंद नाही.
सन २०१३च्या वृक्षगणनेनुसार पालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक तसेच खासगी जागांवरील वृक्षांची संख्या ३८ लाख आहे. यातील अनेक वृक्ष कित्येक वर्षे जुने आहेत. विविध उद्यानांमधील वृक्षांबरोबरच शहरातील भांडारकर, कर्वे, जंगलीमहाराज अशा अनेक रस्त्यांवरील वृक्षांचा त्यात समावेश आहे. मोठा वादळी पाऊस झाला तर शहरात अनेक ठिकाणी असे वृक्ष उन्मळून पडतात. संपूर्ण वृक्ष पडला नाही तरी त्याच्या फांद्या मोडून पडतात. गर्दीच्या रस्त्यावर असा प्रकार झाला तर त्यातून अपघात होतात. वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला वृक्ष त्वरित हलवला नाही तर त्यातून वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
पावसाने पडलेले असे वृक्ष हलवण्याची जबाबदारी उद्यान विभागाची की अग्निशमन विभागाची असा वाद महापालिकेत आहे. त्यातून अनेकदा कोणीच ही जबाबदारी घेत नाही. शहरातील उद्याने, वृक्ष प्राधिकरण उद्यान विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही जबाबदारी उद्यान विभागाचीच असे अग्निशमन दलाचे तर आपत्तीच्या प्रसंगी धावून जाण्याचे काम अग्निशमन दलाचे असे उद्यान विभागाचे म्हणणे आहे. वृक्ष पडलेल्या ठिकाणाचे नागरिक फोनवर माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्या वेळी या दोन्ही विभागांकडून त्यांना परस्परांचा दूरध्वनी क्रमांक देऊन तिथे तक्रार करण्यास सांगितले जाते.
पडलेली झाडे उचलण्यासाठी उद्यान विभागात पूर्वी ठेकेदार नियुक्त केले जात असत. या विभागाकडे वाहनांची, मनुष्यबळाची, फांद्या कापण्यासाठीच्या अत्याधुनिक साधनांची कमतरता आहे. त्यामुळेही त्यांच्या कामावर मर्यादा येतात. विशेषत: एकाच वेळी अनेक ठिकाणी वृक्ष पडण्याच्या घटना घडतात, त्यावेळी त्यांची धावपळ होते. ठेकेदार नियुक्तीसाठी या विभागाने प्रशासनाकडे परवानगी मागूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पडलेल्या झाडाखाली कोणी अडकले, फांद्या पडण्यामुळे भिंत वगैरे कोसळून अपघात झाला तर अशा आपत्तीच्या वेळी अग्निशमन दलाची जबाबदारी आहे असे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात न घेता प्रत्येक वेळी कुठेही वृक्ष पडण्याची घटना घडली, किंवा एखाद्या वृक्षाची फांदी कापायची असेल तरीही त्यांच्याकडून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले जाते. पदाधिकारी, नगरसेवकही त्यांच्या प्रभागांमध्ये असा काही प्रकार झाला की लगेच अग्निशमन विभागालाच फोन करतात. ही मूळ जबाबदारी उद्यान विभागाची आहे याचाच सर्वांना विसर पडला असल्याची या विभागाची तक्रार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: There is no wind in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.