पूल आहेच, आता नव्याने ये-जा व्हायला हवी!
By admin | Published: July 12, 2015 04:18 AM2015-07-12T04:18:21+5:302015-07-12T04:18:21+5:30
‘रेड टेप’च्या अडथळ्यांऐवजी स्वागताचे ‘रेड कार्पेट’ घालण्याची आश्वासने आजवर दिली जात होतीच; पण देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांना कृतीची नियोजनबद्ध जोड असल्याचे
- अपर्णा वेलणकर, नाशिक
विशेष मुलाखत : नितीन जोशी
‘रेड टेप’च्या अडथळ्यांऐवजी स्वागताचे ‘रेड कार्पेट’ घालण्याची आश्वासने आजवर दिली जात होतीच; पण देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांना कृतीची नियोजनबद्ध जोड असल्याचे त्यांच्या अमेरिका भेटीत आम्ही अनुभवले आहे. त्यांच्या कार्यकाळात उत्तर अमेरिकेतील मराठी उद्योजक आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये ‘अर्थपूर्ण’ नाते प्रस्थापित होईल आणि त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ मुख्यमंत्री कार्यालयाच्या बरोबरीने आपली जबाबदारी उचलेल, अशी हमी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन जोशी यांनी दिली आहे.
उत्तर अमेरिकाभर पसरलेल्या ५४ महाराष्ट्र मंडळांची मातृसंस्था हा महासागरावरला जुना पूल आहे, मात्र आता त्यावरून नव्याने ये-जा सुरू करण्याची वेळ आली आहे, असेही जोशी म्हणाले.
राज्यात ७० हजार नोकऱ्या आणि ८ हजार कोटींची गुंतवणूक घेऊन मायदेशी परतलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत ‘लोकमत’मध्ये शनिवारी प्रसिद्ध झाल्यानंतर नितीन जोशी शिकागोहून ‘लोकमत’शी बोलत होते. गेल्या आठवड्यात लॉस एंजेलीस येथे संपन्न झालेल्या बीएमएम अधिवेशनात पुढील दोन वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून जोशी यांची निवड झाली आहे. याच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत ‘महाराष्ट्र परिचय केंद्र’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळाची नवी कार्यकारिणी आणि काही स्थानिक उद्योजकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. केंद्रात अनिवासी भारतीयांसाठी स्वतंत्र कक्ष आहे, त्या धर्तीवर मुंबईत अनिवासी मराठी माणसांशी संपर्कासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. या कक्षाशी संपर्कात राहाण्यासाठी बीएमएम सक्षम समिती स्थापन करण्याच्या तयारीत आहे, असेही जोशी यांनी सांगीतले. नितीन जोशी यांच्या अध्यक्षतेखालील बी.एम.एम.च्या नव्या कार्यकारिणीत फिनिक्स येथील सोना भिडे(सचिव), सिएटल येथील मोहिनी चिटणीस ( कोषाध्यक्ष) यांच्याखेरीज विलास सावरगावकर (न्यू जर्सी), अजय हौदे (अटलांटा), अविनाश पाध्ये (बोस्टन), संजीव देवधरे (टोरंंटो) आणि मेधा ओझरकर (ह्यूस्टन) यांचा सदस्य म्हणून समावेश आहे..
पुढील वाटचालीची चतु:सूत्री
गेल्या १० वर्षांत अमेरिकेतील मराठी स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. त्या नव्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोचणे.
महाराष्ट्रातल्या छोट्या गाव-शहरातून अमेरिकेत येऊन उदंड यश मिळवलेल्यांनी मातृगावाशी जोडले जावे म्हणून प्रयत्न करणे.
अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मराठी मुलामुलींचा तेथील उद्योजकांशी संपर्क जुळावा यासाठी नियोजन करणे.
बीएमएम ही नाममुद्रा अमेरिका व महाराष्ट्राबरोबरच जगभरातल्या देशांमध्ये अधिक ठळक होईल यासाठी प्रयत्न करणे.
आता सक्रिय होणार ‘नेम’
मुख्यत्वे साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून उभ्या राहिलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाला ‘स्मरणरंजना’पार घेऊन जाण्याची गरज गेल्या काही वर्षांपासून जाणवते आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकेतील मराठी उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि तेथील यशस्वी व्यावसायिकांचा महाराष्ट्रातील उद्योजकांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी ‘नेम’ (नॉर्थ अमेरिकन मराठी आंत्रप्रुनर्स ) या व्यासपीठाची रचना करण्यात आली होती. हे व्यासपीठ अधिक सक्रिय करण्याचा नितीन जोशी यांचा प्रयत्न आहे