'पापाचे वाटेकरी होणार नाही'; आरक्षण, कायदा सुव्यवस्थेवरून मविआ नेते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 07:17 AM2024-02-26T07:17:14+5:302024-02-26T07:17:37+5:30
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : राज्यात घडलेल्या राजकीय हत्यांच्या घटना, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्दांवर होणाऱ्या सोमवारपासून सुरू विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार आहेत.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख, शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.
'पापाचे वाटेकरी होणार नाही'
राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजाचे, कंत्राटदाराचे सरकारने हित जोपासले आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीने चहापानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महायुती सरकार जनतेसाठी फसव्या घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
वडेट्टीवार म्हणाले...
- या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली आहे. गुंड मंत्रालयात रिल बनवतात.
- पुण्यात २०० गुंडांची परेड होते त्यानंतर पुण्यात कोट्यवधीचे ड्रग सापडतात तरी सरकार गप्प आहे.
- गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने पोलिसांना गुंड जुमानत नाहीत.