महाराष्ट्रात तुरळक सरी
By admin | Published: May 18, 2015 04:22 AM2015-05-18T04:22:58+5:302015-05-18T04:22:58+5:30
अंदमानात शनिवारी दाखल झालेला मान्सून तिथे स्थिरावला असतानाच दुसरीकडे दक्षिण भारतातील मान्सूनपूर्व सरींचा जोर वाढला आहे.
मुंबई : अंदमानात शनिवारी दाखल झालेला मान्सून तिथे स्थिरावला असतानाच दुसरीकडे दक्षिण भारतातील मान्सूनपूर्व सरींचा जोर वाढला आहे. तर महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी सरींचा वर्षाव सुरू असून, पुढील चार दिवस या सरींचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाचे संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार द्वीपसमूह, दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, उत्तर अंदमान समुद्र, अंदमान द्वीपसमूहाच्या काही भागात शनिवारी आगमन झाले आहे. मात्र सद्य:स्थितीमध्ये त्याचे आगमन स्थिरावले आहे. तर मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील.