"राज्यातील खासगी शाळांच्या मुद्द्यावर सरकार - शिक्षणसंस्थांच्यात एकत्रित चर्चा व्हायला हवी"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 10:18 PM2023-03-20T22:18:53+5:302023-03-20T22:20:51+5:30
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
Neelam Gore: राज्यातील खासगी शाळांबाबत धोरणात्मक चर्चा व्हावी. याकरिता सरकार आणि शिक्षणसंस्था यांनी एकत्रितपणे चर्चा केली पाहिजे, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधान परिषदेत आज तारांकित प्रश्नादरम्यान आमदार किरण सरनाईक यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. दहा वर्षे झाले तरी सदरचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. खासगी शाळांचा प्रश्न चर्चेला आला. यावेळी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नासंदर्भात सभागृहात उत्तर दिले.
याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले की, शाळा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. यावर सरकार आणि शिक्षण संस्थांनी एकत्रितपणे चर्चा करावी. या दोघांची तयारी असेल तर यामध्ये धोरणात्मतक निर्णय नक्की घेता येऊ शकेल. यावर मंत्रिमहोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
बनावट गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री संदर्भात तात्काळ बैठक घ्या!
राज्यात सर्रासपणे बनावट गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री केली जात आहे. यामुळे समाजात कितीतरी लोकांचा बळी जात आहे. त्यामुळे हे अधिवेशन संपायच्या आतमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी आरोग्यमंत्री, वैद्यकीय मंत्री यांच्यासह बैठक घ्यावी आणि या बैठकीबाबत अवगत करण्यात यावं असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेत दिले.
आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईमध्ये बनावट गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले की, सदरच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या चर्चेत सभागृहातील सन्माननीय सदस्य हे अनुभवी असून त्यांनी अनेक मौल्यवान सूचना केलेल्या आहेत. त्यांचा विचार करून मंत्रीमहोदयांनी निर्णय घ्यावा. याकरिता आरोग्यमंत्री, वैद्यकीय मंत्री यांच्यासह बैठक घेतली जावी. यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल असे सांगितले.