शिक्षणात वेदाभ्यास असावा
By Admin | Published: January 20, 2017 12:39 AM2017-01-20T00:39:06+5:302017-01-20T00:39:06+5:30
सामान्य व्यक्तीलाही वेद समजावेत, म्हणता यावेत, यासाठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर वेदांचे अध्ययन व अध्यापन सुरू व्हावे
पुणे : सामान्य व्यक्तीलाही वेद समजावेत, म्हणता यावेत, यासाठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर वेदांचे अध्ययन व अध्यापन सुरू व्हावे, अशी अपेक्षा योगगुरू रामदेवबाबा यांनी व्यक्त केली. वैदिक परंपरा सर्वसामान्यांनाही समजावी म्हणून लवकरच भारतीय शिक्षा बोर्डाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळेत गुरुवारी आयोजित वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसास गुरुजी जन्मशताब्दी सांगता समारंभात ते बोलत होते.
ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, महापौर प्रशांत जगताप, बँक आॅफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, सुभाषचंद्र, अभ्यंकर उपस्थित होते. रामदेवबाबा म्हणाले, ‘‘मी वैदिक आहे. योगाचार्यही आहे. कर्मयोगीसुद्धा आहे. संपूर्ण जीवन मी वेद व योगकार्यासाठी समर्पित केले आहे. वैदिकशास्त्राला ग्लॅमर नाही; पण ही विद्या गौरवास्पद आहे. कारण, वैदिकांच्या तपश्चर्येने वेदांची परंपरा आजपर्यंत जपली आहे.’’
शंकराचार्य महाराज म्हणाले, ‘‘लॉर्ड मेकॉलेने भारतीयांना नोकर बनविले तेव्हापासून नोकरी मिळावी, हीच भावना भारतीयांमध्ये रुजली. पण, येथून पुढे मी मालक कसा होईन, हीच भावना भारतीयांनी जपली पाहिजे. युवा पिढीने नोकरी न करता स्वत:चे उद्योग करावेत.’’
वेदमूर्ती मोरेश्वर घैसासगुरुजी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
>सुभाषचंद्र म्हणाले, ‘‘वेदांमध्ये भारताची संस्कृती जपलेली आहे. अशा योगातूनच मीदेखील मोठा माणूस झालो आहे. मनुष्य कसा आहे, तो कोण आहे, हे वेदांमुळे शिकलो. जो विश्वाचा विचार करतो, तो मनुष्य म्हटला जातो. तसेच, जो वेदांचा विचार करतो, त्याला देव म्हटले जाते.’’