वाचन संस्कृतीसाठी अत्याधुनिक वाचनालय हवे

By admin | Published: January 18, 2017 01:46 AM2017-01-18T01:46:09+5:302017-01-18T01:46:09+5:30

वाचाल तर वाचाल असे नेहमी म्हटले जाते. या वाचन संस्कृतीमधून अनेक थोर विचारवंत, अनेक युग पुरुष निर्माण झाले.

There is a state-of-the-art library for reading culture | वाचन संस्कृतीसाठी अत्याधुनिक वाचनालय हवे

वाचन संस्कृतीसाठी अत्याधुनिक वाचनालय हवे

Next


रावेत : वाचाल तर वाचाल असे नेहमी म्हटले जाते. या वाचन संस्कृतीमधून अनेक थोर विचारवंत, अनेक युग पुरुष निर्माण झाले. परंतु वाढत्या आधुनिकतेबरोबर अनेक माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे वाचन संस्कृती खूप कमी झाली आहे. वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी आणि वाचकांची संख्या वाढविण्याकरिता सर्वसमावेशक पुस्तके असणाऱ्या ग्रंथालयांची
गरज लक्षात घेऊन पालिकेने ठिकठिकाणी सुसज्ज ग्रंथालये निर्माण करावीत, अशी मागणी वाचक वर्गाकडून होत आहे.
परिसरातील रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बिजलीनगर, शिवनगरी, गिरीराज सोसायटी आदी भागात कोठेही पालिकेचे ग्रंथालय नसल्यामुळे काही प्रमाणात का होईना असणाऱ्या वाचकांची गैरसोय होत आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबरच उपनगरांचा विकास झपाट्याने होत आहे सुसज्ज रस्ते व विविध विभागाची पालिकेने स्थापना केली आहे. या सोबतच क्रीडा व सांस्कृतिक विभाग पालिकेकडे आहे. हा विभाग शहरातून चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी विविध ठिकाणी चांगल्या प्रतीची मैदाने निर्माण केली आहेत. शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता विविध ठिकाणी सांस्कृतिक केंद्रे उभी केली. पालिकेने इतर भागात ग्रंथालये निर्माण केली. परंतु वाचनाची गोडी निर्माण होण्याकरिता या भागामध्ये कोठेही ग्रंथालये उपलब्ध नसल्यामुळे चांगले वाचक व वक्ते निर्माण होऊ शकत नाहीत.
शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवडेनगर आदी भाग ८० टक्के प्राधिकरणबाधित असल्यामुळे व पालिकेच्या असणाऱ्या विरंगुळा केंद्र आणि व्यायामशाळा येथे बांधकामास एफएसआय उपलब्ध नसल्यामुळे जागेअभावी ग्रंथालय निर्माण करू शकत नाही. भविष्यात प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास या भागात चांगल्या दर्जाचे ग्रंथालय निर्माण करता येईल. एकंदरीत जागेचा अभाव, वाचकांची पुस्तकाअभावी रोडावणारी संख्या, प्रशासनाचे दुर्लक्ष अशा एक ना अनेक कारणांमुळे ग्रंथालयाची निर्मिती या भागात होऊ शकली नाही. या भागात ग्रंथालय सुरू करावे, अशी मागणी वाचक करीत आहेत. (वार्ताहर)
>पालिकेचा वाचनालय हा उपक्रम केवळ नावापुरता राहिला आहे. कोणत्याही वाचनालयात तीच तीच पुस्तके दिसतात. पुस्तक खरेदी करताना कोणते निकष लावले जातात, कोणास ठाऊक? वाचक कमी झालेत याला या ग्रंथालयांतील पुस्तकांचा दर्जा हे देखील एक कारण आहे. नवनवीन लेखकांची, वाचकप्रिय, बेस्ट सेलर पुस्तकांची वानवाच आहे. किंबहुना अशी पुस्तके असतात हे संबंधित अधिकाऱ्यांना ठाऊक तरी आहे का, असा प्रश्न वाचनालयांतील पुस्तकांची यादी पाहिली की पडतो. धार्मिक पुस्तकांना मागणी नसतानाही दर वर्षी त्यांची खरेदी केली जाते. दर्जेदार, नवनवीन विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिल्यास वाचक निश्चितच वाढतील.
- अरुणा सोनवणे, वाचक
>सध्याच्या आधुनिक जगामध्ये वावरत असताना अनेक माध्यमे लहान मुले सहजतेने हाताळत आहेत. लहान वयात थोरांच्या गोष्टी, शूरवीरांचे पराक्रम, संस्कारक्षम बोधकथा आदी बाबींकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. सर्व इलेक्ट्रॉनिकमाध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा परिणाम बालमनावर होत आहे. त्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे.
- श्रीकांत धनगर,
वाचक

Web Title: There is a state-of-the-art library for reading culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.