अगदी शेवटच्या क्षणाला मोठा ट्विस्ट आला! दोन निलेश लंके मैदानात; सुजय विखेंची चाल की...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 02:50 PM2024-04-26T14:50:58+5:302024-04-26T14:53:00+5:30
Nilesh Lanke vs Sujay Vikhe: रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत. तिथे २०१४ ला तसाच घोळ झाला होता सुनिल तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने ११००० मते मिळविली होती, तर तटकरे २००० मतांनी पडले होते.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपाने सुजय विखेंना पुन्हा उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार निलेश लंके यांनी उमेदवारी दाखल केली आहे. अशातच शेवटच्या दिवशी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणाला मोठा डाव टाकला आहे. निलेश लंके नावाच्या आणखी एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरला आहे.
आता अहमदनगर लोकसभा निवडणुकीत दोन निलेश लंके उभे राहणार आहेत. निलेश साहेबराव लंके नावाच्या व्यक्तीने आपला अर्ज दाखल केला आहे. यामुळे एकतर निशाणी नवीन आणि लंकेही दोन दोन अशा संभ्रमात खऱ्या निलेश लंकेंची मते डमी निलेश लंके घेणार आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव निलेश ज्ञानदेव लंके असे आहे. यामुळे तुतारी वाजविणारा माणूस मतदारांना शोधावा लागणार आहे. गडबडीत डमी निलेश लंके यांच्या नावासमोरील बटण देखील दाबले जाण्याची शक्यता आहे. ईव्हीएमसमोर भल्याभल्यांची धांदल उडते, यामुळे डमी उमेदवार असेल तर चुकून त्याला मतदान केले जाते. रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत. तिथे २०१४ ला तसाच घोळ झाला होता सुनिल तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने ११००० मते मिळविली होती, तर तटकरे २००० मतांनी पडले होते.
पवार गटाचा आरोप...
सुजय विखे यांनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपराच आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे.