मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:01 AM2022-08-03T11:01:42+5:302022-08-03T11:02:09+5:30
तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई झाली असती तर आजचा दिवस आला नसता असं शिवतारेंनी सांगितले.
पुणे - ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मी मुख्यमंत्र्यांसोबतच होतो. हा हल्ला झाला तेव्हा वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. घटनेच्या वेळी कुजबुज सुरू होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यावरच हल्ला करायचा असं सुरू होतं. बऱ्याच ठिकाणी ही चर्चा झाली. मात्र उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला. या घटना चुकीच्या आहेत. अशाप्रकारे वागणं असेल तर ते चालणार नाही. कुणीही शब्दाला शब्द देऊ नका. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांना शांत बसण्याचं आवाहन केले अशी माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
विजय शिवतारे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनाही सोडणार नाही अशी कुजबुज होती. गर्जेल ते पडेल काय? लोकशाहीने जेवढे शक्य होईल तेवढं वागायचं. कायदा सुव्यवस्था बिघडवू द्यायची नाही. हिंगोलीचे संपर्कप्रमुखाने जो कोणी या आमदारांची, मुख्यमंत्र्यांची गाडी फोडेल त्याचा सत्कार उद्धव ठाकरेंच्या हस्ते करू असं चिथावणीखोर विधानं केली आहे. पोलिसांनाही शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे घेऊन चाललोय. संयम किती ठेवायचा हा प्रश्न आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई झाली असती तर आजचा दिवस आला नसता. प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघातील वाघ आहेत. आम्हीदेखील ग्राऊंड पातळीवर काम केले आहे. आम्हाला अलर्ट राहण्याची गरज नाही. तानाजी सावंत यांनी भावनेच्या भरात काही बोलले असतील. परंतु कार्यकर्ते प्रचंड संतापलेले आहेत. पोलीस त्यांची कारवाई करत आहेत. संयम तुटू न देणे हेच सध्या योग्य आहे असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.
नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात कात्रज चौकात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात यांना देखील मुंबईतून ताब्यात घेतले आहे.