गडकरींचा पुतळा बसवतानाही झाला होता वाद!
By Admin | Published: January 5, 2017 03:40 AM2017-01-05T03:40:37+5:302017-01-05T03:40:37+5:30
ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात बसवतानाही वाद झाला होता. आचार्य अत्रे यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी
पुणे : ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात बसवतानाही वाद झाला होता. आचार्य अत्रे यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी केलेल्या भाषणातही त्याचा उल्लेख केला होता. ‘त्यांचा पुतळा इतरत्र बसवता आला नाही, त्या वादात मला पडायचे नाही. गडकरी यांची अशी इच्छा होती, की माझी समाधी जर कुणी बांधली तर ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी असावी. कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थांची पायधूळ माझ्या समाधीवर उडावी, अशी त्यांची काव्यमय व भावपूर्ण कल्पना होती,’ असे आचार्य अत्रे त्या वेळी म्हणाले होते. गडकरी यांच्या पुतळ्याचे अनावरण आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी अत्रे यांनी केलेल्या भाषणाची आॅडिओ क्लिप महाराष्ट्र कलोपासक संस्थेकडे उपलब्ध होती. संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकुरदेसाई यांनी ती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली. वाचकांसाठी हे संपूर्ण भाषण देत आहोत.
महान ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी महान साहित्यकार, मराठी रंगभूमीवर नवयुग प्रवर्तणारे, स्वतंत्र प्रतिभेचे नामवंत नाटककार आणि महाराष्ट्रामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी आणलेल्या विनोदाच्या तत्त्वज्ञानाचा घरोघरी प्रचार करणारे, विनोद पंडित राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा आज संभाजी उद्यानात उभारला जात आहे. आज हे पवित्र काम करण्याकरिता मला पाचारण केले, हा माझ्या आयुष्याचा सर्वांत मोठा सन्मान समजतो. सर्व सन्मानांपेक्षा माझ्या गुरूंचा पुतळा आपण उभारायला सांगितल्यामुळे मी महापालिकेचा ऋणी आहे. गडकरी यांना जाऊन ४३ वर्षे झाली. पुणे ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांचा पुतळा इतरत्र बसवता आला नाही, त्या वादात मला पडायचे नाही. गडकरी यांची अशी इच्छा होती, की माझी समाधी जर कुणी बांधली तर ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी असावी. कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थांची पायधूळ माझ्या समाधीवर उडावी, अशी त्यांची काव्यमयव भावपूर्ण कल्पना होती.
ही इच्छा जर साकार झाली असती, तर आम्हा सर्वांना आनंद झाला असता. मी कठोर बोलू शकतो; पण आजचा दिवस कठोर बोलण्याचा नाही. संभाजी उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला, ही गोष्ट वाईट झाली नाही. ज्या संभाजीच्या चरित्रावर गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे नाटक लिहिले त्याच्या नायकाचे नाव ज्या उद्यानाला दिले आहे, त्या उद्यानात गडकरी यांचा पुतळा उभारला जावा, हाही मोठा योगायोग आहे. १९३८मध्ये जेव्हा मी पुणे नगरपालिकेचा चेअरमन होतो, तेव्हा या उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ माझ्या हस्ते झाली, त्याच उद्यानात माझ्या गुरूंच्या पुतळ्याचे माझ्याच हस्ते अनावरण होत आहे, हाही एक मोठा योगायोग अनपेक्षित आहे. आणखी एक योगायोग आहे. ओंकारेश्वर हे गडकरी यांचे आवडते मंदिर. पुण्याला असताना रोज संध्याकाळी ओंकारेश्वराच्या दर्शनाला आले नाहीत, असे कधी व्हायचे नाही. लोक त्यांना म्हणत, ते भित्रे होते; पण तसे नव्हते. मी दोन-चार वेळेला ओंकारेश्वर मंदिरात आलेलो होतो. म्हणून, ते अशा ठिकाणी बसले आहेत, त्यांचा आवडता ओंकारेश्वर त्यांच्या समीप आहे. तिथेच त्यांचा पुतळा उभरला जात आहे, याचे त्यांच्या आत्म्याला समाधान वाटत असेल. -आचार्य अत्रे