देवेंद्र फडणवीस यांच्यावर अहवालात ठपका नव्हता
By admin | Published: February 16, 2017 04:55 AM2017-02-16T04:55:24+5:302017-02-16T04:55:24+5:30
शिवसेनेने नंदलाल समितीच्या अहवालाचा आधार घेत मुख्यमंत्री व नागपूरचे तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असले
यदु जोशी / मुंबई
शिवसेनेने नंदलाल समितीच्या अहवालाचा आधार घेत मुख्यमंत्री व नागपूरचे तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असले तरी, आपल्या अहवालात फडणवीस यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नव्हता, असे नंदलाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, नागपूर महापालिकेतील घोटाळा झाल्याचा अहवाल आपण दिल्याचेही ते म्हणाले.
नंदलाल सध्या वाराणसीमध्ये आहेत. मोबाइलवर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला नागपूर महापालिकेतील घोटाळ्यांची चौकशी करण्यास सांगितले होते. मी त्यासाठी सुरुवातीला तयार नव्हतो. मला वादात कशाला पाडता, असे मी म्हटले होते. पण आपण निष्पक्ष चौकशी कराल आणि आपल्याबाबत एक विश्वासार्हतादेखील आहे, असे विलासरावांनी मला सांगितले होते.
नंदलाल म्हणाले की, फडणवीस यांनी वैयक्तिक कोणताही भ्रष्टाचार केल्याचे मला चौकशीमध्ये आढळले नाही. त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात महापालिका सभागृहाच्या बैठकी नियमित झाल्या नाहीत, असा निष्कर्ष मात्र मी नोंदविला होता.
आता त्या चौकशीला बरीच वर्षे झाली, पण साधारणत: १४-१५ मुद्द्यांवर मी त्या वेळी चौकशी केली होती. प्रकर्षाने आठवतो तो क्रीडा साहित्य घोटाळा. आपापल्या वॉर्डात क्रीडा साहित्याचे वाटप करण्यासाठी नगरसेवकांना विशेष निधी दिला जायचा. अनेक नगरसेवकांनी पैशांची उचल केली पण साहित्य वाटलेच नाही. खोटी बिले सादर करून पैसा मात्र घेतला, असे चौकशीत आढळले होते. औषधी खरेदीमध्येही तसेच झाले होते. त्या प्रकरणात भाजपासह विविध पक्षांच्या नगरसेवकांना अटक झाली होती. अशा पद्धतीने खरेदीची पद्धत महापालिकेत त्यापूर्वीदेखील होती, असे नंदलाल म्हणाले.