थरथराट झाला यंदा संमिश्र !
By admin | Published: August 26, 2016 02:31 AM2016-08-26T02:31:23+5:302016-08-26T02:31:23+5:30
जिल्हाभरात ठिकठिकाणी नेहमीप्रमाणे दहीहंडी थरार पहावयास मिळाला.
पालघर/वसई : जिल्हाभरात ठिकठिकाणी नेहमीप्रमाणे दहीहंडी थरार पहावयास मिळाला. शहरी भागातील गोविंदांनी थरांचे व गोविंदाचे वयोमर्यादेचे बंधन झुगारून दिले. तर ग्रामीण भागात ते कटाक्षाने पाळले गेले. यावेळी महिला गोविंदा पथकांचा उत्साह जोरात होता. पण पावसाने दांडी मारल्याने टँकर मागवून त्यांची उणीव भरून काढावी लागली.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दहीहंडी वीस फुटापर्यंत आणि १८ वर्षांवरील गोविंदांचा सहभाग असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात यंदा हंडी बांधणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, यंदा गोविंंदांनी अनेक ठिकाणी किमान पाच ते सहा थरांची सलामी दिल्याचे दिसून येत होते. काही गोविंदा पथकात १८ वर्षांपेक्षा कमी मुलांचा समावेश होता. विशेष म्हणजे पोलिसांच्या डोळ्यादेखत पाच ते सहा थरांची सलामी दिली जात होती.
जिल्ह्याच्या विक्रमगड, जव्हार, पालघर, बोईसर, मनोर, वाडा, मोखाडा, डहाणू आदी भागात अनेक मंडळांनी मनोरंजनाचे र्काक्रम ठेवले होते. त्यात डीजे, लावणी, आॅर्केस्ट्राचा समावेश होता. काही ठिकाणी हिंंदी-मराठी मालिकांमधील काही तारकांनी हजेरी लावली होती. आज दिवसभरात पावसाने पाठ फिरवल्याने काही मंडळांनी पाण्याचे टँकरची व्यवस्था केली होती. दरम्यान, जिल्ह्यात कुणीही जखमी किंवा कुणावर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त नव्हते. नवघर माणिकपूर मध्ये साधेपणाने दहीहंडी उत्सव करण्यात आला.
>रस्ते अडवल्याने
वाहतूककोंडी
वसई विरार परिसरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवरच दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. विरार पूर्वेकडे चंदनसार रोड, फूलपाडा रोड, आर. जे. नगर याठिकाणी काही राजकीय नेत्यांनी थेट रस्ता अडवून दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
मनसेची हंडी अल्पवयीन गोविंंदाने फोडली
नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरात मनसेने लावलेली हंडी रमेश भगत यांच्या माखन चोर गोविंंदा पथकाने सात थर लावून व शेवटच्या थरावरील दहा वर्षाच्या गोविंंदाने फोडली. धक्कादायक बाब म्हणजे ही हंडी चक्क तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रगती नगर पोलीस चौकीसमोरच लावण्यात आली होती.