महाराष्ट्रात होते ३१ लाख मराठा कुणबी; ब्रिटीशकालीन जनगणनेवरून विश्वास पाटील यांचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:32 PM2023-10-31T12:32:54+5:302023-10-31T12:32:54+5:30
आंदोलनाचा वणवा; मराठवाड्यात जाळपोळ, कऱ्हाडमध्ये मोर्चा
दुर्गेश सोनार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ब्रिटिश राजवटीत १८८१ साली महाराष्ट्रातील तेव्हाच्या १३ जिल्ह्यांमध्ये मिळून ३० लाख ६९ हजार ७४० मराठा कुणबी होते. तेव्हा केलेल्या जनगणनेतून महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या असून, त्यात तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख ८८ हजार ८२५ मराठा कुणबी होते. महाराष्ट्रातील लाखो कुणबी-मराठ्यांच्या अस्सल नोंदींचे तपशील त्यावेळच्या ब्रिटिश गॅझेटियरमध्ये उपलब्ध आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी या संदर्भातले अभ्यासपूर्ण संशोधन मांडले आहे.
ब्रिटिश इंडिया सरकारने १८८१ साली संपूर्ण भारतात जातिधर्मनिहाय जनगणना केली होती. तत्कालीन महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत झालेल्या नोंदींमध्ये केवळ कुणबी-मराठाच नव्हे तर सोनार, सुतार, धनगर, हेटकरी, ब्राह्मणांच्या विविध पोटजाती, मुसलमान, ज्यू अशा सर्वांचा सखोल सर्व्हे ब्रिटिश सरकारने केला होता. यासंदर्भात ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी गेले चार महिने सातत्याने संशोधन करून त्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ब्रिटिश काळापासून उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा वस्तुस्थितीच्या आधारावर विचार व्हावा. मी महाराष्ट्रभरातील तसेच दिल्ली, विजापूर, हैदराबाद इत्यादी ठिकाणचे अनेक दप्तरखाने, ग्रंथालये, शासकीय कार्यालयांतील कागदपत्रे पडताळून या विषयाचा सखोल अभ्यास केला. संबंधित सत्य आकडे लक्षात घेऊन, आरक्षणासाठीची ही लढाई शास्त्रशुद्ध पातळीवरच पार पाडली जावी.
- विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक
विदर्भातील नोंदी काय?
नागपूर जिल्ह्यात १,५२,००० कुणबी असल्याची नोंद असून मराठ्यांची वेगळी संख्या ११,००० अशी देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात ७९,००० आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीनशे गावांतील कुणबी मालगुजारींची संख्या ९५,००० इतकी नोंद आहे.
पुण्यात ४ लाख कुणबी
१८८१ साली पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ९,००,६२१ होती. यात कुणबी चार लाख होते, अशी नोंद आढळते. कुणब्यांचे पोशाख, त्यांच्या चालीरीती, व्यवसाय, लग्नाच्या पद्धती, मृत्यूनंतरचे दहनाचे विधी अशी पुणे जिल्ह्याच्या संदर्भातील खुलासेवार माहिती ब्रिटिश गॅझेटियरमध्ये पान क्रमांक २८४ ते ३०९ मध्ये देण्यात आलेली आहे.
‘विशेष अधिवेशन घ्या, राज्यपालांनी पुढाकार घ्यावा’
मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून याप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची सोमवारी राजभवन येथे भेट घेऊन केली. मराठा आरक्षणाबरोबर ऐरणीवर आलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, कमी पावसामुळे दुष्काळाची स्थिती, शेतमालाला नसलेला भाव, अमली पदार्थांचा विषय या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तातडीने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे. मराठा समाजात असंतोषाची भावना असून उद्रेक होईल अशी स्फोटक परिस्थिती आहे. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड झाले आहे, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून मराठा समाजातील तरुण आत्महत्या करत आहेत. राज्यपालांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी आरक्षण विषयावर बोलावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलून त्यांनाही आश्वस्त करावे. अघटित घडू नये यासाठी मध्यस्थी करा व प्रश्न सोडवा, अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.
राज्यभरात काय घडले?
- नवी मुंबई : दिवा ऐरोली सर्कल, नेरूळ सीवूड, कळंबोलीचा करावली चौकात साखळी उपोषण.
- अकोला : अकाेला जिल्हाधिकारी कार्यालयावर साेमवारी सकल मराठा आक्राेश माेर्चा धडकला.
- वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन.
- बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यात नेत्यांना फिरण्यास, सभा घेण्यास व राजकीय प्रचार करण्यास बंदी, मलकापूर, खामगावमध्ये आंदोलने.
- शेगाव : १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून निघणारी एल्गार रथयात्रा रविकांत तुपकर यांनी तूर्तास स्थगित केली आहे.
- सांगली : जिल्हाभरात आंदाेलनाची धग, मशाल फेऱ्या; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
- धाराशिव : धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला, संतप्त तरुणांनी टायर पेटविले
- इस्लामपूर (जि. सांगली) : मराठा आरक्षणाला पाठिंबा देत ऊस आंदोलनाची आक्रोश पदयात्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्थगित केली.
- कोल्हापूर : आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा; कोल्हापुरात मराठा समाजाची मागणी. जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचे राजकीय कार्यक्रम स्थगित : सतेज पाटील. आरक्षण मिळेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम
घेणार नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ.
दोन बसेस पेटविण्याचा प्रयत्न
सोमवारी हिंगोली आगारातील दोन बसला आग लावण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला, तर वसमत तहसील कार्यालयात एका मराठा बांधवाने गळफास लावून तर आखाडा बाळापूर येथे दोघांनी पेट्रोल अंगावर ओतून घेतले.
आम्ही कुणबी; पती मराठा, मग मुलांची जात कोणती? कुणबी महिलांचा सरकारपुढे यक्षप्रश्न
हिंगोली : विदर्भातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असून, त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभही मिळतो; परंतु मराठवाड्यात मात्र त्यांच्या अपत्यांना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळत नाही. हा कुठला न्याय, असा यक्षप्रश्न हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील महिलांनी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारपुढे ठेवला आहे. विदर्भात जन्मलेल्या अनेक मुलींचे विवाह मराठवाड्यातील मुलांशी झाले आहेत. लग्नानंतरही त्या मुलींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो. त्या महिलांना ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविता येते; परंतु त्यांचे पती व अपत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. असे का व्हावे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सामूहिक फारकतनामा देण्याची परवानगी द्या
आम्ही कुणबी आणि पती मराठा, तर आमच्या मुलांची जात सरकारने सांगावी? मराठा एकच असतानाही सरकारच्या नजरेत ओबीसी आणि मराठा वेगळे असतील तर आंतरजातीय विवाह महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत ५० हजार आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे अडीच लाख रुपये देण्यात यावेत. निवडणुकीसाठी एका बाॅण्डवर जात बदल होऊ शकतो तर आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जात बदल का होऊ शकत नाही, सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे अथवा सामूहिक फारकतनामा घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी साटंबा येथील कुणबी महिलांनी केली.
अंगावर ओतले डिझेल
चाकूर : चार युवकांनी जुने बसस्थानक येथे सोमवारी दुपारी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले. वैभव गोविंद धोंडगे, शहाजी अंकुशराव शिंदे, नवनाथ चंद्रशेखर बिरादार व कृष्णा शत्रुघ्न धोंडगे अशी या युवकांची नावे आहेत.
महिला उपसरपंचाचा राजीनामा
कजगाव, ता. भडगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील उपसरपंच वंदनाबाई दीपक पाटील यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर येथील गावकऱ्यांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.
बंदोबस्त वाढविला
नांदेड : नांदेड परिक्षेत्रातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या चारही जिल्ह्यांत मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचेही ‘मिशन मराठा आंदोलन’ पाहायला मिळत आहे.
३,६७०- अतिरिक्त होमगार्ड मागविले, नेत्यांच्या घराला सुरक्षा देण्यासाठी मनुष्यबळ.
२३४- ठिकाणी नांदेड परिक्षेत्रात उपोषणे, परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत एसटी बस सेवापूर्णत: बंद