औंधमधील ५ शाळांचे वर्ग वाढले
By admin | Published: May 16, 2016 01:04 AM2016-05-16T01:04:56+5:302016-05-16T01:04:56+5:30
५ शाळांना इ.८ वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे विधी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास गायकवाड यांनी दिली
औंध : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ विभागामार्फत शैक्षणिक वर्ष सन २०१६-१७ पासून औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ५ शाळांना इ.८ वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे विधी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास गायकवाड यांनी दिली.
गायकवाड म्हणाले की, औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, कै. बाबूरावशेठजी बालवडकर प्राथमिक विद्यालय, अहिल्यादेवी होळकर प्राथमिक विद्यालय, माता रमाबाई आंबेडकर प्राथमिक विद्यालय व वसंतदादा पाटील प्राथमिक विद्यालय या पाच शाळांना शैक्षणिक वर्ष सन २०१६-१७ पासून इ. ८ वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी या शाळांतून ७ वी पास झालेल्या अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गरीब विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीसाठी परिसरातील खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागत होता. परंतु, खासगी शाळांची भरमसाठ फी, महागडे शैक्षणिक साहित्य यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना सातवीनंतर शाळा सोडावी लागत होती. विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढत होते. मात्र, या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळणार असून, आता कोणत्याही विद्यार्थ्याला शाळा सोडावी लागणार नाही. (वार्ताहर)