गोव्यात यापुढे ‘दारू पिण्यास बंदी विभाग’ होणार
By admin | Published: August 9, 2016 04:28 AM2016-08-09T04:28:49+5:302016-08-09T04:28:49+5:30
पर्यटकांकडून मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी, किनाऱ्यांवर, रस्त्यांवर, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर खुलेआम दारू प्यायली जाते व बाटल्या, कॅन तेथेच टाकून दिले जातात
पणजी : पर्यटकांकडून मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी, किनाऱ्यांवर, रस्त्यांवर, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर खुलेआम दारू प्यायली जाते व बाटल्या, कॅन तेथेच टाकून दिले जातात. अनेक ठिकाणी तर बाटल्या फोडल्याही जातात. अशा असंख्य तक्रारींमुळे सरकार काही जागा ‘दारू पिण्यास बंदी असलेले विभाग’ म्हणून जाहीर करणार आहे.
विधानसभेत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी संबंधित विधेयक मांडले असून, त्यात अशी तरतूद आहे. खुल्या जागेत व रस्त्यांच्या बाजूने दारूच्या बाटल्या, कॅन वगैरे टाकल्यामुळे पर्यावरणाची हानी होतेच, शिवाय पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो. परप्रांतांमधून आलेले लोक उघड्यावर दारू पितात व त्याचा त्रास स्थानिकांना होतो. त्यातून शांततेचा भंग होतो, तणाव निर्माण होतो, असे अबकारी ड्युटी (दुरुस्ती) विधेयक-२०१६ मध्ये म्हटले आहे.
बंदी असलेल्या ठिकाणी कोणी दारू पिताना सापडल्यास, प्रथम एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. त्यानंतर, प्रत्येक वेळी दोन हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. दंडाचे प्रमाण दहा हजार रुपयांपर्यंतही वाढविता येईल, अशी तरतूद विधेयकात आहे. सरकारने विविध प्रकारे या दुरुस्ती विधेयकाद्वारे पंचवीस लाखांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित धरला आहे.
याच विधेयकात फेणीची नवी स्वतंत्र व्याख्या करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. गोव्याच्या अस्मितेशी फेणी जोडली गेली आहे. त्यामुळे फेणी हे गोव्याचे हेरिटेज मद्य ठरते. फेणीचा दर्जा हा बाजारपेठेत स्कॉच, व्हिस्की व टक्वीला या बरोबरीचा व्हावा, असेही विधेयकात म्हटले आहे. फेणी व हेरिटेज स्पिरिटची व्याख्या ठरविण्यासाठी गोवा अबकारी ड्युटी कायदा, १९६४ मध्ये नव्या कलमांचा समावेश दुरुस्ती विधेयकाद्वारे केला आहे.