'वंचित'ची मदार असलेल्या दलित मतांचे होणार विभाजन !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:55 AM2019-07-30T11:55:15+5:302019-07-30T11:57:15+5:30
विदर्भात बसपाला चांगला जनाधार असून येथे अनुसूचित जातीची सुमारे १५ टक्के लोकसंख्या आहे. ही मते कायम राखण्यासाठी बसपाकडून 'एकला चलो रे'चा नारा देण्यात आला आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या हक्कांच्या मतांना हिस्सेदार होणार आहे. त्यामुळे सहाजिकच हा वंचितला धक्का मानला जात आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत मुस्लीम आणि दलितांचे ऐक्य घडवून आणत आघाडीच्या नाकी नऊ आणणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत असून अजुनही वंचितचा आघाडीसोबत जाण्याचा इरादा दिसत नाही. लोकसभेला वंचितमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाले. परंतु, आता हीच अडचण वंचित समोर उभी ठाकली आहे.
वंचितचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिशी दलित मते एकगठ्ठा असल्याचे सांगण्यात येते. परंतु, राज्यात आजही मायावती यांच्या बसपाला मानणारा एक गट आहे. वंचितवर नाराज बसपाने राज्यातील सर्वच्या सर्व २८८ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दलित, मुस्लीम आणि इतर उपेक्षीत समाजघटक आणि हिंदी भाषिकांचा जनाधार कायम राखण्यासाठी देखील बसपाच्या वतीने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे बहुजन समाज पक्षाला अपेक्षित मते मिळाली नाही. परंतु, विधानसभेला तसं होणार नाही, याची काळजी बसपाकडून घेण्यात येत आहे. विदर्भात बसपाला चांगला जनाधार असून येथे अनुसूचित जातीची सुमारे १५ टक्के लोकसंख्या आहे. ही मते कायम राखण्यासाठी बसपाकडून 'एकला चलो रे'चा नारा देण्यात आला आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या हक्कांच्या मतांना हिस्सेदार होणार आहे. त्यामुळे सहाजिकच हा वंचितला धक्का मानला जात आहे.
मुस्लीम मतं वळविण्याचे आव्हान
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मुस्लीम आणि दलित मतांची सांगड घातली. त्यात त्यांना यश आले असले तरी अनेक मतदार संघात मुस्लिमांनी मतदान केले नसल्याची तक्रार खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच केली होती. मतदार संघात मुस्लीम उमेदवार असल्यास त्याला मते मिळतात, परंतु मुस्लीम उमेदवार नसल्यास मुस्लीम मते मिळत नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे मुस्लीम उमेदवार नसलेल्या मतदार संघात मुस्लीम मते मिळविण्याचे आव्हान वंचितसमोर आहे.