कुंभारीत होणार काट्याची लढत

By admin | Published: February 16, 2017 07:07 PM2017-02-16T19:07:10+5:302017-02-16T19:07:10+5:30

कुंभारीत होणार काट्याची लढत

There will be a fight for the thornbush | कुंभारीत होणार काट्याची लढत

कुंभारीत होणार काट्याची लढत

Next

कुंभारीत होणार काट्याची लढत
सोलापूर : आॅनलाईन लोकमत
नेहमीच दुर्लक्षित राहिलेला कुंभारी जिल्हा परिषद गट यंदा प्रथमच चर्चेत आला आहे़ राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या सुरेश हसापुरे यांच्या उमेदवारीने निवडणुकीला महत्त्व आले आहे़ विकासकामांपेक्षा जातीय समीकरणे, स्थानिक आणि उपरा उमेदवार याच मुद्द्यावर प्रचाराचा अधिक भर दिसून येतो़
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कुंभारी गटाच्या राजकारणावर अक्कलकोटच्या नेतेमंडळींचा प्रभाव अधिक आहे़ आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी सलगी करून सुरेश हसापुरे यांनी उमेदवारी पक्की केली तर सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांना शह देण्यासाठी आणप्पा बाराचारे यांना भाजपकडून रिंगणात उतरवले आहे़ हसापुरे - बाराचारे यांच्यातील ही लढाई आ़ म्हेत्रे - सचिन कल्याणशेट्टी यांच्या विधानसभा निवडणुकीचा ‘ट्रेलर’ ठरणार आहे़ पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत एकाकी लढत देत भाजपच्या सागर तेलीने तगडा उमेदवार शिवानंद आंदोडगी यांना पराभूत केले होते़ आंदोडगी हे हसापुरे यांचे समर्थक होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत़
लिंगायत, धनगर समाजाचे प्राबल्य या गटावर आहे़ भाजपने कुंभारी गटात धनगर समाजाचे आणप्पा बाराचारे, कुंभारी गणात ताराबाई शिरीष पाटील यांना रिंगणात उतरवून दोन्ही समाजात समन्वय साधला आहे़ काँग्रेसची भिस्त केवळ लिंगायत समाजावर आहे़ सुरेश हसापुरे जि़ प़ गटातून तर पं़ स़ मध्ये मीनाक्षी बिराजदार दोघेही लिंगायत आहेत़ धोत्री, दर्गनहळ्ळी, कर्देहळ्ळी, वडगाव-शिरपनहळ्ळी या गावातील मतविभागणीवर धोत्री गावच्या काँग्रेसच्या उमेदवार जिजाबाई शिंदे, भाजपच्या रेखा नवगिरे यांची भिस्त आहे़ या गटात आण्णाराव पाटील राष्ट्रवादी, गेनसिद्ध खांडेकर शिवसेना, अशोक ढोणे अपक्ष रिंगणात आहेत़
---------------------------
स्थानिक आणि उपरा
गेली अनेक वर्षे कुंभारी गटात काँग्रेसकडून बाहेरचा उमेदवार लादला जातो़ स्थानिकांना डावलल्याची भावना मतदारात आहे़ कै़उमाकांत राठोड, कै़ बसवेश्वर नरोळे, नळपती बनसोडे, कमल कमळे, लक्ष्मण गोतसुर्वे यांना काँग्रेसने लादले होते़ भाजपने याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे़ ‘आपले गाव आपला उमेदवार’ हे घोषवाक्य घेऊन तरुण प्रचारात उतरले आहेत़ भाजपने स्थानिक उमेदवार दिला आहे़
--------------------------
दावे-प्रतिदावे
गेल्या तीन वर्षात कुंभारीसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा काँग्रेसचे सुरेश हसापुरे करीत आहेत़ तीर्थक्षेत्र विकास निधीशी हसापुरे यांचा काय संबंध असा सवाल भाजपकडून केला जात आहे़ या उलट पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ९ कोटींचे रस्ते मंजूर केल्याचा दावा भाजपचे सागर तेली यांनी केला़ दीड वर्षात आणप्पा बाराचारे यांनी स्वत:च्या खर्चातून कुंभारीत पाणीपुरवठा केल्याचे सांगितले जाते़ आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांचे नेतृत्व ही काँग्रेसची जमेची बाजू आहे तर तरुणांची मजबूत फळी यावर भाजपची मदार आहे़
-----------------------
दृष्टिक्षेपात कुंभारी गट
मतदारसंख्या - १८,८१६
स्त्री - ८,६३६
पुरूष - १०,१८०
कुंभारी गण -
६२६४ मतदार
धोत्री गण - १२,५५२ - मतदार
समाविष्ट गावे - कुंभारी, कर्देहळ्ळी, धोत्री, दर्गनहळ्ळी, वडगाव-शिरपनहळ्ळी,
उमेदवार - कुंभारी गट - ५, कुंभारी गण - ५
धोत्री गण - ३

Web Title: There will be a fight for the thornbush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.