सर्वदूर पावसाचा जोर वाढणार

By admin | Published: June 28, 2016 03:54 AM2016-06-28T03:54:54+5:302016-06-28T03:54:54+5:30

कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोर धरलेला पाऊस येत्या तीन दिवसांत राज्यात सर्वदूर धो-धो पडेल, अशी आनंदाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

There will be an increase in the overall rainfall | सर्वदूर पावसाचा जोर वाढणार

सर्वदूर पावसाचा जोर वाढणार

Next


पुणे : कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोर धरलेला पाऊस येत्या तीन दिवसांत राज्यात सर्वदूर धो-धो पडेल, अशी आनंदाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
संपूर्ण राज्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) व्यापले असले तरी पावसाची ‘जोर’धार फक्त कोकणातच आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यातही दमदार पाऊस होत आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात काही अपवाद वगळता अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे सर्व जण दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
या भागांमध्ये बाष्पयुक्त वारे खेचण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी हवेची आवश्यक स्थितीच निर्माण झालेली नाही. मात्र बंगालच्या उपसागरात ओडिशा व आंध्र प्रदेश राज्यांच्या किनारपट्टीजवळ हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागला आहे. तो पुढील २४ तासांत तीव्र होण्याची शक्यता असल्याने कोकणासह उर्वरित राज्यात पावसाचा जोर वाढेल, असे हवामानशास्त्र विभागाने कळविले आहे. कोकणात मुसळधार कायम असून रत्नागिरी पाठोपाठ मुरूड येथे १५०, हर्णे १४०, वेंगुर्ला १२०, रोहा ११०, मालवण येथे ९०, दापोली, वैभववाडी येथे ८०, कणकवली, सावंतवाडी, पाली, ठाणे येथे ७०, अलिबाग, गुहागर, श्रीवर्धन येथे ६०, अंबरनाथ, भिरा, कल्याण येथे ५०, डहाणू, देवगड, महाड, माथेरान, राजापूर, उल्हासनगर येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली. भिवंडी, चिपळूण, मुंबई, पोलादपूर येथे ३०, कर्जत, पालघर येथे २० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रात गगनबावडा येथे ६०, महाबळेश्वरमध्ये ४०, इगतपुरी, राधानगरी, शाहूवाडी येथे २०, कवठेमहांकाळ, पन्हाळा, पुणे येथे १० मिमी पाऊस पडला. मराठवाड्यात माहूर येथे ४०, हिंगोली येथे १०, विदर्भात ब्रह्मपुरी येथे ३०, चंद्रपूर, अमरावती, नागपूर येथे १० मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)

Web Title: There will be an increase in the overall rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.