महापौर निवडीत चमत्कार घडणारच
By admin | Published: November 7, 2015 12:09 AM2015-11-07T00:09:45+5:302015-11-07T00:15:09+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा : विकासासाठी महापौर भाजपचाच हवा; दबावाचे राजकारण, घोडेबाजार करणार नाही
कोल्हापूर : देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास, तोही सुसूत्रपणे व्हावा, याकरिता कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणे आवश्यक आहे. त्यामुळे माझे इतर राजकीय पक्षांच्या सर्व नगरसेवकांना आवाहन आहे की, त्यांनी भाजपचा महापौर होण्यासाठी आम्हाला मतदान करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. या सर्व प्रक्रियेत आम्ही कोणावर दबाव आणणार नाही, कोणाला आमिष दाखविणार नाही, तसेच घोडेबाजारही करणार नाही, अशी ग्वाहीही पाटील यांनी पत्रकारांना साक्षी ठेवून जनतेला दिली.
१६ नोव्हेंबरला शंभर टक्के भाजपचाच महापौर होईल, असे आत्मविश्वासपूर्वक सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, आम्ही शिवसेना व अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा तर घेऊच; पण राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसचाही बाहेरून पाठिंबा घ्यायला तयार आहोत. आम्हाला कोणाचे वावडे नाही. कोल्हापूरचा विकास अधिक सुसूत्रपणे आणि गतीने व्हायचा असेल, तर भाजपचा महापौर झाला तर अधिक चांगले होईल.
सर्वाधिक ३२ जागा मिळविणारा पक्ष म्हणून भाजप-ताराराणी आघाडीच आहे. शिवसेनेचे चार व अपक्ष तीन, अशा ३९ नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे. जनतेने सर्वाधिक मते आम्हाला दिली आहेत. म्हणूनच भाजपचा महापौर करीत असताना अन्य राजकीय पक्षांनी आम्हाला मदत करावी, असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे उपस्थित होते.
पोटशूळ कुणाचा..?
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा महापौर होतो म्हणून तुमच्यासह आणि कुणाला जास्त पोटशूळ उठला आहे का? अशी थेट विचारणा पत्रकारांनी केली. त्यावर दादांनी हसत हसत हा पोटशूळ नसून विकासाचे राजकारण असल्याचे उत्तर दिले.
तापातून उठल्यासारखे..
तापातून उठलेल्या माणसाला सारखे खाऊ-खाऊ असे वाटते. तसे तुमचे सत्तेबाबत झाले आहे का? अशी विचारणा पालकमंत्र्यांना केली असता काही क्षण सावरत त्यांनी शहराच्या भल्यासाठीच आम्हाला सत्ता हवी असल्याचे सांगत वेळ मारून नेली.
शिवसेना व अपक्षही सोबतच
पाठिंब्याबाबत शिवसेनेशी आमची प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेनेचे नेते सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांचे नगरसेवक आमच्यासोबत आहेत. तसा निर्णय लवकरच जाहीर होईल. तीन अपक्ष नगरसेवकांशीही आमची चर्चा झाली. त्यांचाही पाठिंबा आम्हाला राहील.
महाडिकांचा काय संबंध?
आमदार महादेवराव महाडिक यांनी राष्ट्रवादीला भाजप-ताराराणीचा बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव हसन मुश्रीफ यांच्याकडे दिला होता, हे खरे आहे का? असे विचारता पाटील म्हणाले की, मला ही माहिती तुमच्याकडूनच कळते आहे. महाडिक हे कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यांचा आणि भाजप-ताराराणी आघाडीचा कसलाही संबंध नाही. त्यांचे चिरंजीव आमच्याशी संबंधित आहेत.
मुश्रीफ - सतेज यांनी शिकवू नये
महानगरपालिकेत पालकमंत्री घोडेबाजार करणार का? असा सवाल सतेज पाटील यांनी केला असल्याबाबत पालकमंत्री म्हणाले की, ‘ज्या सतेज पाटील व मुश्रीफ यांनी अनेक वर्षे घोडेबाजारच केला, त्यांनी आम्हाला हे शिकवू नये. त्यांनी असे करणे म्हणजे करून करून भागली व देवपूजेला लागली, अशातला प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.
राजकारणात चमत्कार होतात
महापालिकेचा निकाल जाहीर झाला तेव्हाही मी म्हणालो होतो की, प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावू; परंतु निकालाची सर्व आकडेवारी बाहेर आल्यानंतर सर्वाधिक मते महायुतीला मिळाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय ३९ नगरसेवकांचे पाठबळ आम्हाला आहे. बहुमतासाठी केवळ दोन नगरसेवक कमी पडतात. राजकीय पक्ष म्हणून जेव्हा आम्ही निवडणुका लढतो, त्या सत्तेत येण्यासाठीच लढत असतो. राजकारणात चमत्कार घडत असतात. महापौर निवडीवेळीही असे चमत्कार होतील, अशी आमची अपेक्षा आहे.
पवार यांना भेटलो नाही..
महापालिकेतील पाठिंब्याबद्दल मी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिल्लीत भेटलो नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘त्यासाठी मला दिल्लीला जाण्याचीही गरज नाही. आम्ही आता सत्तेत आहोत व पवारसाहेबांशी हे फोनवरही बोलू शकतो.’
आधी ‘कल्याण-डोंबिवली’साठी पाठिंबा द्या : राऊत
कोल्हापूर : सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापुरात नेमके काय करायचे आहे, तेच आम्हाला समजत नाही; पण भाजपने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेसाठी आम्हाला पाठिंबा दिल्यास त्यांना कोल्हापुरात सहकार्य करण्याबाबत विचार केला जाईल, असे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
कोल्हापुरात महापौर भाजपचा करण्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका जाणून घेण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. त्यांनी महापौरपदाबाबत पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून होईल, असे सांगितले. त्यामुळे शिवसेना सचिव राऊत यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, महापौर निवडणुकीत आम्हाला सहकार्य करावे, याबाबत मंत्री पाटील यांनी आमच्याशी चर्चाच काय, साधा संपर्कही साधलेला नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजपने आम्हाला पाठिंबा दिल्यास कोल्हापुरात त्यांना सहकार्याबाबत आम्ही विचार करू.
निर्णय ‘मातोश्री’वरूनच...
महापौरपदासाठी भाजपला सहकार्य करायचे अथवा नाही, याबाबतची स्थानिक पातळीवरील कार्यवाही ‘मातोश्री’वरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय आणि आदेशानुसार केली जाईल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, सहकारमंत्री पाटील म्हणतात त्या पद्धतीने कोणत्याही स्वरूपातील चर्चा झालेली नाही; शिवाय ‘मातोश्री’वरील आदेशाशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही.