अयोध्येत मंदिर-मशीद बांधल्यास वाद राहणार नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 04:16 AM2019-11-01T04:16:07+5:302019-11-01T04:16:26+5:30
निकाल मंदिराच्या बाजूने झाल्यास त्याचे आम्ही स्वागत करू, ही भूमिका मुस्लिम समाजाने घेत समंजसपणा दाखविला आहे.
बारामती (जि. पुणे) : येत्या ६ डिसेंबरला सुप्रीम कोर्ट राम मंदिराचा निर्णय देणार आहे. या ठिकाणी राम मंदिर आणि मशीद या दोन्हींसाठी जागा दिल्या गेल्या, तर मला वाटत नाही त्यातून काही तंटा किंवा मतभेद होतील, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
पवार म्हणाले की, निकाल काय होईल, कसा होईल माहिती नाही, समजा निकाल मंदिराच्या बाजूने झाल्यास हिंदूंना आनंद होईल, तर कदाचित मुस्लिम समाजात अस्वस्थता येईल. निकाल मंदिराच्या बाजूने झाल्यास त्याचे आम्ही स्वागत करू, ही भूमिका मुस्लिम समाजाने घेत समंजसपणा दाखविला आहे. बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईत दंगली झाल्या. त्यामुळे संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुंबईत स्थिती सावरण्यासाठी मला मुंबईत परतावे लागले, त्या दंगलीमुळे राज्याचे खूप मोठे नुकसान झाले. आता सर्व घटक योग्य ती जबाबदारी घेतील, अशी अपेक्षा असल्याचे पवार यांनी सांगितले.