प्रामाणिक डॉक्टरांवर अन्याय होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:09 AM2017-08-06T00:09:39+5:302017-08-06T00:09:47+5:30
‘कट प्रक्टिस’ हा वैद्यकीय क्षेत्राला लागलेला डाग असून, त्याची झळ थेट सामान्यांना बसते. त्यामुळे त्या विरोधात कायदा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रामाणिक डॉक्टरांवर अन्याय होणार नाही
जळगाव : ‘कट प्रक्टिस’ हा वैद्यकीय क्षेत्राला लागलेला डाग असून, त्याची झळ थेट सामान्यांना बसते. त्यामुळे त्या विरोधात कायदा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रामाणिक डॉक्टरांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅम्सकॉन २०१७’ या अकॅडमी आॅफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या राज्यस्तरीय दोन दिवसीय परिषदेचे आयोजन येथे करण्यात आले आहे. शनिवारी त्याचे उद्घाटन झाले.
महाजन यांच्यासह आयएमएचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, सचिव डॉ. पार्थिव संघवी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र आयएमएचे माजी उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील व डॉ. प्रताप जाधव यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
जळगावात मेडिकल हब
वैद्यकीय खात्याचा मंत्री असल्याने आपण जळगावात मेडिकल हब आणले. येथे एकाच ठिकाणी सर्व पॅथींचा अभ्यासक्रम राहाणार असून, देशातील एकमेव मेडिकल हब जळगावात असेल, असे महाजन यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघासह अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे, १०८ रुग्णवाहिकेचे चालक डॉक्टरांकडून टक्केवारी घेतात. हे स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी मान्य करीत, ही समस्या सोडवून त्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले.
वैद्यकीय प्रवेशासाठी हुशार मुलांना प्रवेश मिळून संस्थाचालकांची मनमानी रोखण्यासाठी ‘नीट’ सारख्या परीक्षा घेतली जात असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवरील सदस्यांच्या निवडीची यादी सोमवार किंवा मंगळवारी जाहीर केली जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. डॉ. उल्हास पाटील यांनी डॉक्टर, हॉस्पिटलवरील हल्ले रोखण्यासाठी कडक कायदे करावे, अशी मागणी केली.