आरोंदा जेटी होणार नाही
By admin | Published: January 7, 2015 10:33 PM2015-01-07T22:33:50+5:302015-01-07T23:31:25+5:30
नारायण राणे : ग्रामस्थांना सर्व कायदेशीर मदत करणार
सावंतवाडी/आरोंदा : माझा जन्म या जिल्ह्यात झाला आहे. यामुळे येथील लोकांचे ऋण फेडण्यासाठी माझे हे समाजकारण आहे. ज्या गावात पोट भरायला जातात, त्याच ग्रामस्थांना दगडांनी मारणे कितपण योग्य आहे? हे तुमचे सांडलेले रक्त मी कधी विसरणार नाही. पालकमंत्री नसलो, तरी तुमच्या मागे ठामपणे उभा राहीन. पण हे जेटीचे काम होऊ देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आरोंदा येथे दिला. आरोंदा संघर्ष समितीच्यावतीने येथील भद्रकाली मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, सरपंच आत्माराम आचरेकर, पंचायत समिती सदस्या गौरी आरोंदेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर, सुदन बांदिवडेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संघर्ष समितीचे अविनाश शिरोडकर, गजानन तानावडे, जयप्रकाश चमणकर, संदीप नेमळेकर, सभापती प्रमोद सावंत, अशोक सावंत आदी यावेळी उपस्थित होते. आरोंद्यात लाठीमार होत होता, तेव्हा पालकमंत्री जहांगीर आर्टमध्ये उद्धव ठाकरे यांचे फोटो बघत होते. आम्ही आपल्या जनतेला सोडून असे काम केले नसते. अशी टीका त्यांनी केसरकर यांच्यावर केली. प्रास्ताविक संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी केले. ते म्हणाले, कावळ्याने गरूड होण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो गरूड होत नाही. आमच्यावर जो लाठीमार केला, त्यामागचा कर्ताकरविता आरोंदावासीयांनी ओळखला आहे, असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. यावेळी गजानन तानावडे, प्रकाश कवठणकर, गौरी आरोंदेकर, सत्येश खोब्रेकर आदींनी विचार मांडले. (प्रतिनिधी)
जखमींना प्रत्येकी पाच लाखांची मदत
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आरोंद्यात झालेल्या दगडफेकीत तसेच पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्यांना पाच लाखाची मदत दिली. तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठीही लागेल तो खर्च देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गांधींच्या पक्षात असूनही 'गांधीगिरी' सांगणार नाही
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटले की, तुम्ही दगड खाल्लात, परंतु आमच्याकडे दगड नव्हते, असे सांगता, हे योग्य नाही. दगड मारणारे पुन्हा गावात येताना विचार करूनच आले पाहिजेत, अशी तयारी करा. मी जरी काँग्रेसमध्ये गांधींच्या पक्षात असलो, तरी गांधीगिरीच्या मार्गाने मार खा, असे कधीच सांगणार नाही. हे माझ्या नियमात बसत नाही, असे राणे यांनी यावेळी सांगताच आरोंदावासीयांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.