महाराष्ट्रातही दमदार पाऊस होणार; सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:58 AM2019-06-01T03:58:17+5:302019-06-01T03:58:42+5:30
यंदाच्या वर्षी उन्हाची तीवता आणि दुष्काळाची दाहकता पाहिल्यानंतर प्रत्येकाचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.
पुणे : दुष्काळाने होरपळलेल्या जनतेसाठी एक खूशखबर! यंदाच्या वर्षी नैॠत्य मान्सून चांगला राहणार असून, सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा सुधारित अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने शुक्रवारी वर्तविला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस साधारण राहणार असून, दुष्काळाची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रातही दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
यंदाच्या वर्षी उन्हाची तीवता आणि दुष्काळाची दाहकता पाहिल्यानंतर प्रत्येकाचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. आयएमडीने देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत मध्य भारतात (ज्यात महाराष्ट्राचा समावेश होतो. )१०० टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातही पावसाची दमदार पर्जनवृष्टी होणार आहे. वायव्य भारतात सरासरीच्या ९५ टक्के, दक्षिण भारतात ९७ टक्के तर इशान्य भारतात हंगामातील ९१ टक्के पावसाची शक्यता आहे. देशभरात जुलैमध्ये त्या महिन्याच्या सरासरीच्या ९४ टक्के तर ऑगस्टमध्ये ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. मान्सूनवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या सहा घटकांचा समावेश असलेल्या सांख्यिकी प्रारुपावर आधारित यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर, भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेने विकसित केलेल्या ‘मान्सून मिशन' प्रारूपानुसार ९७ टक्के पाऊस पडेल, असेही स्पष्ट केले. तर, प्रशांत महासागरातील कमी तीवतेच्या एल निनोचा प्रभाव मान्सूनच्या उत्तरार्धात कमी होणार असून, न्यूट्रल स्थिती होण्याची शक्यता आहे. सध्या सौम्य स्थितीत असणारा इंडियन ओशन डायपोल मान्सूनच्या उत्तरार्धात पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हा आयओडी मान्सूनसाठी अनुकूल ठरू शकतो असे आयएमडीचे म्हणणे आहे.
मान्सून केरळमध्ये ६ जूनला
मान्सूनने अंदमानाचा संपूर्ण भाग व्यापला असून, अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील मालदीव बेटांवरही मान्सून सक्रीय झाला आहे. ३ जूनपर्यंत बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात तो दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. येत्या तीन दिवसात नैॠत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह जोर धरण्याची शक्यता असून, मान्सून केरळमध्ये ६ जूनला दाखल होण्याचा अंदाज आहे.