राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल; संत बाळूमामाच्या भाकणुकीत नेमकं काय म्हटलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 09:18 PM2022-03-29T21:18:13+5:302022-03-29T21:18:52+5:30
पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार फोफावेल. नेतेमंडळी तुरुंगात जातील असंही भविष्यवाणीत म्हटलं आहे.
कोल्हापूर – आदमापूर येथील संत बाळूमामा भाकणुकीचा सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. मराठी वर्षाचा शेवटची भाकणूक असल्यानं अनेकांचे लक्ष आगामी भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडतील याकडे लक्ष लागलं होते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार असल्याने या तिन्ही पक्षात किती काळ समन्वय राहील हे सांगणे कठीण आहे.
त्यातच विरोधी पक्ष भाजपा सातत्याने सरकार पडणार असल्याची तारीख देत असतो परंतु अडीच वर्ष सरकारला काहीही झाले नाही. मात्र या काळात सरकारचे २ मंत्री कोठडीत गेले आहेत. त्यामुळे सरकारवरील टांगती तलवार कायम आहे. त्यात बाळूमामाच्या भाकणुकीत देशाच्या राजकारणाच्या संदर्भात भविष्यवाणी करण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी मंडळी मोठ्या प्रमाणात पक्षांतर करतील अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.
इतकेच नाही तर राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहील. कमळाचा झेंडा मिरवेल आणि काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरेल. देवा धर्माला विसरून लोकं राजकारणात जातील. पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार फोफावेल. नेतेमंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.
आणखी काय म्हटलं भाकणुकीत?
साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यानं राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होईल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल. सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. सीमा प्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील. दीड महिन्यात धान्य उदंड पिकेल. खरीप पिक चांगले होईल. गोर गरीबाला पुरावा करील. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढर धान्य उदंड पिकलं. गव्हाची शेती मध्यम पिकेल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल सांभाळून ठेवा. बैलाची किंमत बकऱ्याला येईल वैरण – धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील. सरकी फुकाची होईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखांवर जाईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबड मनुष्याच्या पाठीशी लागेल. धनगराच बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल.