झेंडावंदन होणार आता लोकप्रतिनिधींच्याहस्ते
By Admin | Published: April 29, 2015 10:18 PM2015-04-29T22:18:28+5:302015-04-30T00:30:14+5:30
महाराष्ट्र दिन : शासकीय अधिकाऱ्यांची परंपरा निघणार मोडीत
संकेत गोयथळे - गुहागर राज्यात १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिन) व २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या राष्ट्रीय कार्यक्रमांबरोबरच १ मे हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस (महाराष्ट्र दिन) तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांच्याहस्ते ध्वजारोहण करुन साजरा होत होता. यामध्ये आता शासनाने बदल केला असून महाराष्ट्र दिनी आता लोकप्रतिनिधींना हा मान मिळणार आहे. तसा शासन आदेश (परिपत्रक) शासनाने जारी केला आहे.परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र दिनी मुंबई येथील मुख्य शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी मा. राज्यपाल महोदयांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तालयांच्या मुख्यालयी आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री महोदयांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते.
याबाबत तालुक्याच्या मुख्यालयी तहसीलदार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते. याबाबत तालुक्यांच्या मुख्यालयी शासकीय अधिकाऱ्यांच्याऐवजी लोकप्रतिनिधीच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, अशी अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्या अनुषंगाने १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनी आता तहसील कार्यालयाच्या ठिकाणी विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे.
एकाच तहसील कार्यक्षेत्रात एकापेक्षा जास्त विधानसभा सदस्य निवडून येत असतील अशा ठिकाणी पहिल्या वर्षी जास्त मतदार संख्या असलेल्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य ध्वजारोहण करतील व त्यापुढील वर्षी उतरत्या क्रमाने कमी मतदार संख्या असलेल्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य ध्वजारोहण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
हा निर्णय सध्या फक्त महाराष्ट्र दिनापुरता मर्यादित असून त्याची अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून करण्यात यावी असे म्हटले आहे. हे परिपत्रक अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
ध्वजारोहण करताना काही निकष ठरविले गेले असून यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करीत असल्यामुळे त्यांच्या मतदार संघातील तालुक्याच्या मुख्यालयी जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य अथवा विधान परिषद सदस्य नसल्यास संबंधित तहसीलदार ध्वजारोहण करतील. ज्या विधानसभा मतदार संघामध्ये दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र समाविष्ट असेल त्या ठिकाणी ज्या मतदार संघाची मतदार संख्या जास्त असेल त्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य ध्वजारोहण करतील व कमी मतदार संख्या असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य अथवा विधान परिषद सदस्य नसल्यास तहसीलदार ध्वजारोहण करतील.