म्हणून पिंपरी चिंचवड मनपाचे 300 कोटी रुपये वाचले - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 10:22 PM2017-08-12T22:22:06+5:302017-08-12T22:23:55+5:30
पिंपरी चिंचडव महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून न केलेल्या कामांची बिले रोखल्यामुळे महापालिकेचे 300 कोटी रुपये वाचले आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरीत व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड, दि. 12 - पारदर्शक कारभारासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली. पारदर्शक कारभारासाठी आमचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहोत. सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यात वर्षानुवर्षे सुरू असणा-या अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून न केलेल्या कामांची बिले रोखल्यामुळे महापालिकेचे 300 कोटी रुपये वाचले आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरीत व्यक्त केले.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तीन विकास प्रकल्पांचे ई-उदघाटन आणि दोन प्रकल्पांचे भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संजय उर्फे बाळा भेगडे, गौतम चाबूकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, आयुक्त श्रावण हर्डीकर, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.
टक्केवारी प्रकरणात पदाधिका-यांना क्लीन चीट
महापालिकेतील टक्केवारी संदर्भात प्रमोद साठे यांनी दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडे एक लेखी तक्रार केली. भाजपा पदाधिका-यांनी 400 कोटींची बिले रोखली असून बिले काढण्याच्या मोबदल्यात ३ टक्क्यांची मागणी करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. भाजपाची प्रतिमा मलिन झाल्याच्या असंख्य तक्रारी पक्षातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. यावर मुख्यमंत्री काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पहिल्यांदा नगरसेवक झाल्यावर १९९२ मध्ये पिंपरी-चिंचवडला भेट दिली.
येथील महापालिका भवन, क्रीडासंकुल, उड्डाणपुलांची पाहणी केली. नामांकित शहराची प्रतिमा मध्यंतरी खराब झाली. ‘आमच्याकडे सत्ता द्या, स्वप्नातले मॉडेल शहर करु, असे मी निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्यानुसार जनतेने एकहातीसत्ता दिली. आता कामकाजात पारदर्शकता हवी आहे. यापूर्वी कामांची बिले काढण्याची अनिष्ट प्रथा होती. ती पदाधिका-यांनी थांबविली. त्यामुळे ३०० कोटी रुपये वाचले आहेत. ’’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी टक्केवारी प्रकरणात भाजपा पदाधिका-यांना क्लीन चिट दिली.
पुढे मुख्यमंत्री असेही म्हणाले, ‘‘राज्याच्या कानाकोप-यातून रोजगारासाठी पिंपरी चिंचवड येथे नागरिक आले आहेत. येथील औद्योगिकीकरणाने विकास झाला आहे. सक्षम अशी महापालिका आहे. विकासासाठी काही कमतरता भासल्यास राज्य शासनाकडून मदत केली जाईल. आवश्यक असणा-या सर्व विकास प्रकल्पांसाठी राज्य शासन प्राधान्याने मदत करेल. त्यासाठी आवश्यक असणारा निधी पुरवला जाईल.विकासाच्या या संधीचा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी घ्यावा. ई- इनॉग्रेशन’ या पद्धतीने विकास कामांची भुमिपूजने, उद्घाटने केल्यास अधिक लोकांशी बोलता येते. त्यांना छोटीशी चित्रफित दाखविता येते. खर्च वाचतो.’’
स्मार्ट कारभार करा
मुख्यमंत्री असेही म्हणाले, ‘स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी चिंचवडमध्ये क्षमता आहे. स्मार्ट, पारदर्शक कारभार करा, महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा.’’
पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘अनेक प्रकल्पांसाठी मदत हवी आहे, पिंपरी-चिंचवडची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी राज्य शासन सर्व मदत करण्यासाठी तत्पर आहेच गरज भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल, असे सांगितले.
महापौरांचे लग्न, अन् हशा
अविवाहीत महापौर नितीन काळजे यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. मेट्राही लवकर येत आहे. मात्र, अजूनही महापौर अविवाहीत कसे? मी अविवाहीत असतानाच नागपूरचा महापौर झालो. तेव्हा मलाही याचा त्रास झाला. त्यामुळे महापौरांच्या लग्नाविषयी उत्सुकता आहे. आम्हाला लग्नाला बोलवा अथवा न बोलवा परंतु आता लग्नाचा विषय अजेंड्यावर घ्या.’’, यावर नाट्यगृहात एकच हशा पिकला.
बैलगाडीतून मुख्यमंत्र्यांचा प्रवास
बैलगाडा शर्यतीबाबत निर्णय झाल्याने बैलगाडीतून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली. वाजत-गाजत मिरवणूक नाट्यगृहात आली. त्यानंतर उद्घाटन झाले. पुणे पोलीस आयुक्त कार्यालय मार्फत विकसित करण्यात आलेल्या सिटी सेफ मोबाइल अप्लिकेशनचे अनावरणही हस्ते करण्यात आले.
लवकरच आयुक्तालय -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्वत: मान्यता दिली आहे. वाढती लोकसंख्या पाहता आयुक्तालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून वित्त विभागाकडे हे प्रस्ताव गेला आहे, त्यामुळे लवकरच आयुक्तालय सुरू होईल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री