...याच माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील; राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 09:14 AM2020-06-12T09:14:10+5:302020-06-12T09:21:37+5:30
जोपर्यंत कोरोना आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला व त्याच्यासोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल. सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते, असे ठाकरे म्हणाले.
मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या नव्या सुरुवातीचे हे पहिलेच वर्ष आहे. अशातच कोरोनाशी महाराष्ट्र झुंज देत आहे. येत्या 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यांनी पत्राद्वारे मनसैनिकांना मोठे आवाहन केले आहे.
जोपर्यंत कोरोना आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला व त्याच्यासोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल. सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते. गेल्या २,३ महिन्यांच्या काळात येणाऱ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. फक्त त्यात एकच दिलासा देणारी बाब माझ्यासाठी असायची ती म्हणजे ह्या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठया प्रमाणावर पदरमोड करून लोकांच्या मदतीला धावून जात होता. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना इस्पितळात बेड मिळवून देणारा, रुग्णांच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणारा. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या ऐकताना मला एकाच वेळेस आनंद आणि अभिमान दोन्हीही रहायचा, असे ठाकरे यांनी म्हटले.
येत्या 14 तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही नेहमी मला शुभेच्छा देण्यासाठी येता. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबाधिताची संखा कमी झालेली नाही, थोडक्यात सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे उचित नाही. म्हमूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचनावजा आदेश देत आहे. कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका, आहात तिथेच रहा आणि लोकांना मदत करा. हीच माझ्या वाढदिवसाची शुभेच्छा असेल. हे करत असताना तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. तुमच्या जीवापेक्षा मला काहीच मोलाचे नसल्याचे, भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह