'...तर अबू आझमी जिंकले नसते, हे त्यांनाही माहितीये'; संजय राऊतांनी सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:23 IST2024-12-09T11:21:06+5:302024-12-09T11:23:00+5:30
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे.

'...तर अबू आझमी जिंकले नसते, हे त्यांनाही माहितीये'; संजय राऊतांनी सुनावलं
Maha Vikas Aghadi Maharashtra News: महाविकास आघाडीत खटके उडताना दिसत आहे. समाजवादी पार्टीने थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आम्ही भूमिकेशी जुळवून घेणार नाही, असे सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी म्हणाले. त्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यावर आता बोलताना संजय राऊत यांनी उत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले, "आम्ही त्याच्यावर अखिलेश यादवजी आहेत, समाजवादी पार्टीचे प्रमुख; त्यांच्याशी चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल हे आम्ही पाहत आहोत. खरं म्हणजे गेली अनेक वर्ष समाजवादी पार्टी आमच्यासोबत आहे."
त्यांची मते कोणत्या टीमला गेली?
"त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी मदत केली. फक्त जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांत मतदान करण्याची वेळ आली. तेव्हा त्यांची मते आम्हाला मिळाली नाहीत. ती कोणत्या टीमला गेलीत आम्हाला माहिती नाही", असा चिमटा संजय राऊतांनी समाजवादी पार्टीला काढला.
"आताही समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांच्या प्रचाराला मी स्वतः गेलो होतो. मानखुर्दला जाहीर सभा घेण्यासाठी आणि हे आमचे उमेदवार निवडून यावेत म्हणून मी स्वतः गेलो होतो. इतकंच नव्हे तर मानखुर्दला शिवसेनेचा उमेदवार उभा करा म्हणून आमच्यावर दबाव होता", असे संजय राऊत म्हणाले.
"...म्हणून ठाकरेंनी आझमीविरोधात उमेदवार दिला नाही"
"उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला की, समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतील आपला मित्रपक्ष आहे. अबू आझमी त्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार टाकणं म्हणजे आघाडी धर्म न पाळल्यासारखं होईल ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती. त्यामुळे आम्ही मानखुर्द भिवंडी भागात रईस शेख यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार उभे केले नाहीत. जर आम्ही उमेदवार उभा केला असता, तर अबू आझमी विजयी होऊ शकले नसते; हे त्यांनाही माहिती आहे", असे संजय राऊत म्हणाले.