"भ्रष्टाचारात बुडलेले आहेत, तेच...", चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 05:05 PM2024-07-27T17:05:49+5:302024-07-27T17:08:47+5:30
Chandrashekhar Bawankule : अमित शहा यांना तडीपार असं म्हटल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलं, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. या अमित शाह यांच्या टीकेला शरद पवार यांनी आज उत्तर दिले आहे.
सुप्रीम कोर्टानं अमित शाह यांना तडीपार केलं होतं. मात्र तरीही तडीपार केलेल्या व्यक्तीला गृहमंत्री करण्यात आले, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. ते म्हणाले, "अमित शाह आधी गुजरातचे मंत्री होते. तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अमित शाह यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्यं करत आहे", असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, अमित शहा यांना तडीपार असं म्हटल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांनी लक्षणीय काम केलं आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविलं, देशातील अराजकता नियंत्रणात आणली, देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. असा पोलादी पुरुष देशाला मिळाला आहे. त्यामुळं शरद पवार आणि त्यांचे समर्थक सैरभैर झाले आहेत. देशातील सर्व न्यायालयांनी अमित शाह यांना निर्दोष घोषित केलं आहे. जे भ्रष्टाचारात बुडलेले आहेत, तेच अमित शाह यांना दोष देत आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आदरणीय @AmitShah भाई का नेतृत्व संपूर्ण देश ने स्वीकारा है| आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में देश को सुरक्षित करने के काम मे अमित भाई महत्वपूर्ण भूमिका निभा रहे है| पवार साहाब के लोग बोहखला गये है| अमित भाई को देश की सारी अदालतोने निर्दोष करार दिया है| जिनका… pic.twitter.com/bIpghyBHec
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 27, 2024
काय म्हणाले होते अमित शाह?
गेल्या रविवारी पुणे येथील बालेवाडी येथे भाजपचे राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन झाले. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं. जेव्हा जेव्हा राज्यात भाजपची सत्ता आली, तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं. जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते, तेव्हा मराठा आरक्षण जातं. २०१४ ला भाजप सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले मराठा आरक्षण गेलं, तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं ते असं अमित शाह म्हणाले होते.