RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच - हरी नरके
By Admin | Published: January 18, 2016 01:05 PM2016-01-18T13:05:14+5:302016-01-18T13:54:11+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यक्ती महात्मा फुले यांचे वंशज नव्हेतच असा दावा प्रा. हरी नरके यांनी केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.
४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.
५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.
६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.