ते पोस्टर हटवलं, शिवसेनेचं घूमजाव
By admin | Published: October 21, 2015 03:40 PM2015-10-21T15:40:39+5:302015-10-21T16:03:28+5:30
बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होणा-या नेत्यांचे पोस्टर लावून भाजपावर वार करणा-या शिवसेनेने अचानक घूमजाव करत 'ते' वादग्रस्त पोस्टर हटवलं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होणा-या भाजपाचे पोस्टर लावून भाजपावर वार करणा-या शिवसेनेने अचानक घूमजाव करत 'ते' वादग्रस्त पोस्टर हटवलं आहे. पोस्टरमधून कार्यकर्त्यांची भावना व्यक्त झाली, पक्षाने पोस्टर लावण्याचे आदेश दिले नव्हते, कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेने सेना भवनच्या परिसरात भाजपावर निशाणा साधणारे पोस्टर लावल्याने आज सकाळपासूनच वातावरण तापले होते. अटलबिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे बाळासाहेबांसोबतचे फोटो या पोस्टरवर लावण्यात आले होते. जे भाजपा नेते एकेकाळी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होत असत, तेच नेते आता मागील दिवस विसरले असल्याची टीका सेनेने पोस्टरद्वारे केली होती. शिवसेना आणि बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्रात भाजपाचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असली तरी राज्यात आपणच मोठा भाऊ आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्नही शिवसेनेने केला होता. मात्र सेनेच्या या कृतीमुळे राज्यातील वातावरण तापू लागले आणि भाजपातूनही शिवसेनेच्या कृत्याचा विरोध होऊ लागला. जो आदर आम्ही बाळासाहेबांना दाखवला तोच आदर आम्ही उद्धव व आदित्य ठाकरे यांना दाखवू असे सेनेला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. आगामी काळात कदाचित आदित्य ठाकरेच नरेंद्र मोदींसमोर नतमस्तक झालेले दिसतील असा टोला हाणत भाजपा नेते गिरीश व्यास यांनी शिवसेनेला इशार दिला होता.
त्यानंतर शिवसेनेने घूमजाव करत ते पोस्टर हटवले आणि ही कृती पक्षाध्यक्षांच्या आदेशावरून झाली नसल्याचे स्पष्ट करत अप्रत्यक्षरित्या माफीनामाही सादर केल्याचे दिसत आहे.