Himanshu Roy Suicide: 'ते बाहेर आलेच नाहीत; आला तो गोळीचा आवाज!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:05 AM2018-05-13T05:05:28+5:302018-05-13T09:52:06+5:30
सकाळी साहेब नेहमीप्रमाणे नाश्ता करून बेडरूममध्ये गेले. ते एकटेच खोलीत बसलेले असायचे. त्यामुळे आम्ही कोणीच त्यांना बोलवायला गेलो नाही.
मनीषा म्हात्रे
मुंबई : सकाळी साहेब नेहमीप्रमाणे नाश्ता करून बेडरूममध्ये गेले. ते एकटेच खोलीत बसलेले असायचे. त्यामुळे आम्ही कोणीच त्यांना बोलवायला गेलो नाही. त्यांनी जेवण बनवायला सांगितले होते. त्यांच्या आवडीचे जेवण आम्ही बनवले. मात्र, साहेब बाहेर आलेच नाहीत. आला तो गोळीचा आवाज..., असे आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्याकडे काम करणाऱ्या आॅर्डरली व नोकरांनी पोलिसांना सांगितले.
नरिमन पॉइंट येथील सुनीती इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रॉय हे पत्नी भावना यांच्यासोबत राहायचे. त्यांच्याकडे आॅर्डरली हनुमंत कदम व दोन नोकर अनेक वर्षांपासून काम करतात. शनिवारी रॉय यांच्या आत्महत्येप्रकरणी तिघांचे जबाब नोंदविण्यात आले.
त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, शुक्रवारी सकाळी साहेब नेहमीप्रमाणे नाश्ता करायला बाहेर आले. ज्युस पिऊन ते खोलीकडे गेले. जाताना जेवण बनविण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही त्यांच्या आवडीचे जेवण बनविले. सुट्टीसाठी साहेबांच्या नातेवाइकांची मुलेही घरी आली होती. मॅडम व मुले बाहेर हॉलमध्ये बसले होते. घरात आम्ही ७ ते ८ जण होतो. साहेबांना शांतता आवडायची. त्यामुळे त्यांची खोली आतून नेहमी बंद असायची. ते बोलवत नाहीत, तोपर्यंत कोणीही त्यांच्या खोलीत जात नसू. आम्ही जेवण तयार करून साहेबांची वाट पाहात होतो. पण साहेब बाहेर आलेच नाहीत.. आला तो गोळीचा आवाज. आम्ही बेडरूमकडे धाव घेत दरवाजा उघडला. तेव्हा साहेब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
सर्वांसाठीच प्रेरणादायी
रॉय हे सर्वांच्याच जवळचे होते. त्यांची कामाप्रति असणारी निष्ठा, मनमिळावू वृत्ती, हुशारी, देशाप्रतिचे प्रेम हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे आपणही त्यांच्यासारखे सर्वांना समजून घेत जगायला शिकले पाहिजे. लवकरच त्यांची शोकसभा आयोजित करण्यात येणार आहे. त्याबाबत कळविण्यात येईल, असे पत्रकाद्वारे रॉय यांच्या पत्नी भावना रॉय आणि नेहल व्यास, अनिश त्रिपाठी, आशिष त्रिपाठी, अमिष त्रिपाठी या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले आहे.
तिघांनाही मानसिक धक्का
तिघेही मानसिक धक्क्यात आहेत. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे कफ परेडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी सांगितले. घटनास्थळावरील नमुने, रिव्हॉल्व्हर आणि सुसाईड नोट तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आली आहे.