त्यांनी शोधला टोलमुक्तीचा नवा पर्यायी मार्ग
By admin | Published: June 14, 2016 02:48 AM2016-06-14T02:48:11+5:302016-06-14T02:48:11+5:30
नागपूर-अमरावती हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सुंदर झाला खरा; पण त्यावर एका बाजूने १७१ रुपये टोल द्यावा लागत असल्याने हा मार्ग टाळून टोलमुक्तीचा नवा मार्ग वाहनचालक
नागपूर : नागपूर-अमरावती हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सुंदर झाला खरा; पण त्यावर एका बाजूने १७१ रुपये टोल द्यावा लागत असल्याने हा मार्ग टाळून टोलमुक्तीचा नवा मार्ग वाहनचालक अवलंबित असल्याने या महामार्गावरील वाहतूक रोडावली असून पर्यायी मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी दिसू लागली आहे.
नागपूर-अमरावती मार्गावरुन दरदिवशी १० हजार वाहने जात असत. आज ही संख्या पाच ते सहा हजारावर आली असल्याचे गोंडखैरी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला सांगितले.
असा आकारला जातो टोल
अमरावती रोडवर एकूण चार टोल नाके आहेत.त्यात गोंडखैरी, कारंजा, तिवसा आणि नांदगावपेठ नाक्याचा समावेश आहे. एका कार चालकाला नांदगावपेठ टोलवर ८० रुपये, कारंजा ४० रुपये, गोंडखैरी ४१ रुपये आणि तिवसा १० रुपये असा एकूण १७१ रुपये एका वेळचा टोल द्यावा लागतो. येण्याजाण्याचा टोल गृहित धरल्यास तर ३४२ रुपये पडतात. परंतु दोन्ही वेळच्या टोलची पावती एकाचवेळी फाडली तर ६० टक्के कमी टोल लागतो. त्यामुळे २५० रुपयाच्या जवळपास हा टोल पडतो.
सर्व र्बंकारच्या चारचाकी व
त्यापुढील वाहनांसाठी येथे टोल द्यावा लागतो.
टोलचा बोजा टाळण्यासाठी आता नागपूर-बुटीबोरी-केळझर-सेलू-पवनार-पुलगाव-अंजनसिंगी-कुऱ्हा-अमरावती या मार्गाने जाण्यास वाहनचालक पसंती देत आहेत. काही जण पुलगावच्या पुढे चांदूर बाजारमार्गे अमरावती गाठतात. (प्रतिनिधी)
अपघाताचा धोका अधिक : नागपूर-बुटीबोरी-केळझर मार्र्गेे अमरावती ही वाहतूक कमालीची वाढली आहे. अमरावती मार्गावरील चारचार टोलनाक्यांमुळे हे घडत आहे. कारसोबतच ट्रॅव्हल्स बस, टॅक्सीसुद्धा अमरावतीसाठी वर्धा रोडचा वापर करू लागले आहेत. पर्यायी मार्ग हा प्रशस्त नसल्याने आणि वाहतूक वाढल्याने अपघाताचा नेहमीच धोका असतो.
टोल नाके हटवा : कारने अमरावतीला ये-जा करायची तरी एका कारमागे २५० रुपये द्यावे लागत असतील तर लोक पर्यायी मार्गाने जाणारच. अमरावती मार्ग सुंदर झाला आहे पण टोलचा जाच अन्यायकारक आहे. तो रद्द केला पाहिजे.
- नरेश वाहाणे, अध्यक्ष, रिपब्लिकन मूव्हमेंट