‘त्यांना’ देशात राहण्याचा अधिकार नाही
By admin | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:47+5:302016-04-03T03:52:47+5:30
भारतमाता की जय म्हणायचे की नाही यावरून सध्या देशात वाद सुरू असून, भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र
नाशिक : भारतमाता की जय म्हणायचे की नाही यावरून सध्या देशात वाद सुरू असून, भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या घोषणा देणाऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी उभे राहत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने शनिवारी गोदाकाठावर आयोजित संवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. आपल्या पाऊण तासाच्या भाषणात फडणवीस यांनी, ‘भारत माता’ विरोधात घोषणा देणाऱ्यांना आडवे हात घेतले.
भारतमाता की जय, वंदे मातरम या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून, विरोधकांनी प्रसंगी भाजपाला विरोध करावा; परंतु भारत मातेला विरोध करू नये; ते देशातील जनता कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
नाशिकच्या गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी देण्याच्या विषयावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी सोडले त्यावेळी आमदार, खासदार यांनी आपल्याकडे येऊन तक्रार केली; परंतु राज्यातील एक भाग तहानलेला असताना त्यांना पाणी न देणे योग्य होणार नाही, अशी भूमिका आपण घेतली व मराठवाड्याला पाणी सोडले, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला केले लक्ष्य
स्वतंत्र मराठवाड्याच्या विषयावरून भाजपाच्या महिला मेळाव्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केले. ज्यांनी स्वतंत्र मराठवाड्याला विरोध केला, त्यांनीच मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध दर्शविला, एकीकडे संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करायची व दुसरीकडे मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करायचा ही कोणती नैतिकता आहे, असा सवाल करून मराठवाड्यातील जनता आपलीच आहे, ती पाकिस्तानी नाही त्यामुळे एकदा ठरवून टाका जे करायचे ते करा, मला विरोध घ्यावा लागला तरी घेईन व प्रसंगी नाशिककरांची माफी मागेन; परंतु मराठवाड्यासाठी घोटभर पाणी देईन, असे फडणवीस म्हणाले.