"बाळासाहेबांचा फोटो हवा पण मुलगा नको, तो शिवसैनिक नव्हे तर..’’ उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:03 PM2022-07-29T16:03:17+5:302022-07-29T16:04:10+5:30
Uddhav Thackeray Attack on Shinde Group: शिंदे गटाला बाळासाहेबांचा फोटो हवा आहे, पण त्यांचा मुलगा नको आहे. हिंमत असेल तर नवा पक्ष काढून दाखवा, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर केली आहे.
मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच बंडखोर शिंदेगटाकडून शिवसेनेवरच दावा ठोकण्यात आल्याने उद्धव ठाकरेंसमोरील आव्हान वाढले आहे. तेव्हापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिंदे गटावर घणाघाती टीका केली जात आहे. दरम्यान, शिंदे गटाला बाळासाहेबांचा फोटो हवा आहे, पण त्यांचा मुलगा नको आहे. हिंमत असेल तर नवा पक्ष काढून दाखवा, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नाहीत तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत. शिंदे गटाला बाळासाहेबांचा फोटो हवा आहे, पण त्यांचा मुलगा नको आहे. मी वारसा घेऊन पुढे जातोय, म्हणून मी त्यांना नको आहे. ठाकरेंशिवाय शिवसेना होऊ शकते, असं त्यांना वाटत असेल तर ते कदापि होऊ शकणार नाही. मी त्यांना प्रत्येकवेळी आव्हान देतोय की, मर्दाची अवलाद असाल तर स्वत:च्या आई-वडिलांच्या नावाने मतं मागा. माझे आई-वडील आणि शिवसेना ही आपली आईच आहे, ती कशाला सोडताय. काढा नवीन पक्ष, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून त्यांना शिवसेनेतील ४० आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच लोकसभेतील १२ खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील अनेक आजी-माजी नगरसेवकही शिंदे गटात दाखल झाले आहेत. आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.