‘ते’ निघाले सुरतेला अन् राज्यात उडाली खळबळ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची वर्षपूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:57 AM2023-06-20T08:57:01+5:302023-06-20T08:57:47+5:30
बंडातून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही ३० जून रोजी होत असून येत्या निवडणुकांत जनता या युतीला कसा प्रतिसाद देते, याकडे राज्याचे लक्ष आहे.
मुंबई : ४० आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची मंगळवारी (२० जून) वर्षपूर्ती होत आहे. सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेने झालेल्या या बंडाच्या प्रवासाने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. बंडातून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही ३० जून रोजी होत असून येत्या निवडणुकांत जनता या युतीला कसा प्रतिसाद देते, याकडे राज्याचे लक्ष आहे.
बंडापासून सत्ता स्थापनेपर्यंत
२० जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे २५ आमदारांसह गुजरातमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली. उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावत शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीशी असलेली युती तोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची विनंती केली.
२१ जून : ३५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदे यांनी दावा केला.
२२ जून : शिंदे ४० आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले. मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.
२३ जून : एकनाथ शिंदे आणि ३७ आमदारांनी शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषणा केली.
२४ जून : शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल करून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिंदे कॅम्पच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. शिंदे यांनी गुजरातमधील वडोदरा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा हेही तेथे असल्याचे सांगण्यात आले.
२६ जून : उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्याप्रकरणी शिंदे सर्वोच्च न्यायालयात.
२७ जून : सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आणि उपाध्यक्ष झिरवाळ यांना अविश्वास प्रस्तावाबाबत तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
२८ जून : मंत्रिपदावरून भाजप-शिंदे यांच्यात बैठक.
२९ जून : देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट
घेऊन फ्लोअर टेस्टची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने ३० जून रोजी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
३० जून : एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ