"ते अडीच वर्ष घरात होते..."; बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 09:32 AM2022-10-14T09:32:37+5:302022-10-14T09:33:00+5:30
निवडणूक ही अटीतटीची असते. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आमची तयारी झाली आहे असं मंत्री संदीपान भुमरे म्हणाले.
औरंगाबाद - ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत आमचा काहीही संबंध नाही. महापालिकेवर आम्ही दबाव आणला नाही. कोर्टानं याबाबत निर्णय दिला आहे. निवडणूक म्हटलं तरी कुणीही उभं राहणारच आहे. एखादं काम झालं नाही तर सरकारने दबाव आणला हेच आरोप होतात. आम्ही आधीपासून मैदानात आहे. ते अडीच वर्ष घरात बसले होते. आमच्यामुळे मैदानात आले. आम्ही आजही मैदानात आहे असा टोला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आमची तयारी झाली आहे. निवडणूक ही अटीतटीची असते. यात आमचा विजय होईल. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. बिगर मेहनतीशिवाय जिंकता येत नाही. आम्ही या निवडणुकीत जिंकू. सगळ्या तयारीनिशी आम्ही मैदानात उतरलो आहे. आमची पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे जागा भक्कम करण्यावर आमचा भर आहे असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कोर्टात जावं लागतंय. मैदानासाठी कोर्टात जा, उमेदवारीसाठी कोर्टात जा. अरे हिंमत असेल तर मैदानात या. माझी तर तयारी आहे. मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही याची तयारी करण्यापेक्षा एकाच व्यासपीठावर समोरासमोर येऊ आणि होऊन जाऊ देत काय व्हायचं ते" असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं.
वादळ निर्माण करणारे शरद पवारसोबत
छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी फारुक अब्दुल्ला आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "फारुख अब्दुल्ला मला भेटले. त्यांची आणि बाळासाहेबांची चांगली मैत्री होती. ते आल्या आल्या मला म्हणाले अजिबात घाबरु नको वडिलांसारखा लढ. अशी अनेक वादळं शिवसेनेनं अंगावर घेतली आहेत. त्यावेळी अनेक मोठी वादळं देखील शिवसेनेसोबत होती. आताच्याही वादळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखी वादळं सोबत आहेत. वादळ निर्माण करणारे शरद पवार सोबत आहेत. वादळ असो, पाऊस असो न डगमगता उभे राहणारे सोबत असताना मी तर लढाईच्याच क्षणाची वाट पाहातोय" असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"