पालघरमध्ये सापडलेले ते ‘आरडीएक्स’च
By admin | Published: November 4, 2016 06:28 AM2016-11-04T06:28:55+5:302016-11-04T06:28:55+5:30
राज्य दहशतवादविरोधी विभागाने (एटीएस) कारवाई करत जप्त केलेली स्फोटके, आरडीएक्स असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) केलेल्या चाचणीत उघड झाले
मुंबई : दिवाळीपूर्वी पालघरच्या सातवली गावात राज्य दहशतवादविरोधी विभागाने (एटीएस) कारवाई करत जप्त केलेली स्फोटके, आरडीएक्स असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) केलेल्या चाचणीत उघड झाले आहे. याचा सविस्तर अहवाल येत्या आठवड्यात एटीएसला पाठविण्यात येणार असल्याची माहिती न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातवली गावामधील एका गोदामात स्फोटके दडवून ठेवण्यात आल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, खुद्द एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मुंबई आणि ठाणे एटीएसच्या पथकांनी २७ आॅक्टोबरच्या रात्री
संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १५ किलोंची स्फोटके जप्त केली होती. मात्र, याबाबत एटीएसच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास कमालीची गुप्तता पाळली होती.
या प्रकरणी एटीएसने पाच जणांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. या स्फोटकांचे १६ नमुने तपासणीसाठी एफएसएलला पाठविण्यात आले होते. चाचणीमध्ये ते आरडीएक्स असल्याचे उघड झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)
>बंदोबस्तात वाढ
मुंबईला लागून असलेल्या पालघर किनाऱ्यावरून ही स्फोटके आणण्यात आल्याचा संशय एटीएस अधिकाऱ्यांना असून, हा संवेदनशील परिसर असल्याने, समुद्रकिनाऱ्यांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तींसह अन्य अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनांवर नजर ठेऊन मुंबई किंवा आसपासच्या परिसरात अतिरेकी हल्ल्याची योजना होती का, याबाबत एटीएसचे अधिकारी कसून तपास करत आहेत.