"तुम्हाला लाखवेळा गद्दार म्हणणार, हिंमत असेल तर मारून दाखवा", शिवसेनेच्या रणरागिणीचं संतोष बांगर यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 11:15 AM2022-07-17T11:15:16+5:302022-07-17T11:15:54+5:30
Ayodhya Pol, Shivsena: जी गोष्ट मला काही करू नको म्हणून सांगितलं जातं, ती गोष्ट मी आधी करते. काय करतील करून करून, पाय मोडतील, जीव घेतील. माझे आई-वडील म्हणतील की, लेकीने शिवसेनेसाठी स्वत:चा जीव दिला. तसं झालं तर माझ्यासारखं भाग्यवान कुणीच नसेल, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.
मुंबई - आम्ही बंडखोर, गद्दार नाही, कुणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करू, असा इशारा कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला होता. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या आव्हानाला आता शिवसेनेच्या रणरागिणीने प्रतिआव्हान दिलं आहे. तुम्हाला लाखवेळा गद्दार म्हणणार, हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्या कानाखाली मारून दाखवावीच, असं आव्हान शिवसेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार संतोष बांगर यांना दिले आहे.
संतोष बांगर म्हणताहेत की, आम्हाला गद्दार म्हणायचं नाही, बंडखोर म्हणायचं नाही. तसं म्हटल्यास आमचे शिवसैनिक तिथे जाऊन त्यांच्या कानाखाली आवाज काढतील. मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना जेवढं ओळखते, ते असं लोकांच्या पाठीत खंजिर खुपसणारे नाही आहेत. मला केवळ बांगर यांच्याकडून धमक्या आलेल्या नाहीत तर मला स्थानिक पातळीवरूनही धमक्या आल्या आहेत, अशी माहिती अयोध्या पौळ यांनी दिली.
मी आधी सर्वांच्या पोस्ट लिहायचे. मात्र जेव्हा मी बालाजी कल्याणकर यांच नाव घेऊन पोस्ट लिहिल्या. त्यानंतर मला भायखळ्यातून पोस्ट लिहिल्या तेव्हा मला भायखळ्यातून फोन आले. तुम्ही आमच्या मॅडमविरुद्ध लिहायचं नाही, अशी धमकी देण्यात आली. मात्र मी तोपर्यंत काहीच लिहिलं नव्हतं. मी अशी मुलगी आहे की, जी गोष्ट मला काही करू नको म्हणून सांगितलं जातं, ती गोष्ट मी आधी करते. काय करतील करून करून, पाय मोडतील, जीव घेतील. माझे आई-वडील म्हणतील की, लेकीने शिवसेनेसाठी स्वत:चा जीव दिला. तसं झालं तर माझ्यासारखं भाग्यवान कुणीच नसेल, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.
जेव्हा मला भायखळ्यातून धमक्या आल्या तेव्हा मी सर्वप्रथम सेनाभवनला गेले. तिथे महिलांची मिटिंग होती. तिथे आदित्य ठाकरेंच्या कानावर ही गोष्ट घातली. तसेच दोन दिवसांनंतर २०८,२०९ मध्ये आदित्य यांची मिटिंग होती तेव्हा तिथे एका महिलेनं तू इथे कशाला आलीस म्हणून विचारणा करत, गैरवर्तन केलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत जेव्हा मिटिंग झाली तेव्हा मी माझा जीव गेला तरी शिवसेनेची बाजू मांडणं थांबवणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं, असेही अयोध्या पौळ यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही शिवसेनेचेच आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या मनात आहेत. चांडाळ चौकडीला बाजूला सारून आम्हाला मान-सन्मानाने बोलवा. हा भगवा असाच विधानसभेवर फडकवत ठेवू, अशी साद कळमनुरीचे बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी घातली. तसेच कोणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करा, असा इशारा देखील बांगर यांनी यावेळी दिला होता.