‘ते’ अधिकारी येणार गोत्यात
By admin | Published: June 5, 2017 05:24 AM2017-06-05T05:24:42+5:302017-06-05T05:24:42+5:30
राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता, अशी माहिती उघड झाली असून, अशा सर्व अधिकाऱ्यांची मुंबई गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य प्रशासन आणि पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणातील महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखे आणि त्याच्या साथीदारांशी राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता, अशी माहिती उघड झाली असून, अशा सर्व अधिकाऱ्यांची मुंबई गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार आहे.
राज्यातील पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे रॅकेट उघड झाल्यानंतर, हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. आता या प्रकरणात राज्य पोलीस दलातील अनेक आयपीएस व मपोसे अधिकारी या टोळीच्या संपर्कात होते, अशी प्राथमिक माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली आहे. या प्रत्येकाला येत्या काळात गुन्हे शाखेत चौकशीला सामोरे जावे लागेल, असे संकेत मिळत आहेत. टोळीच्या संपर्कात आलेले, पण बदलीच्या आमिषाकडे दुर्लक्ष केलेले अधिकारीही या प्रकरणी गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे. या टोळीबाबत माहिती असूनही वरिष्ठांना कळवून कारवाई न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवला जाऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, हिरमुखे व त्याच्यासह अटक करण्यात आलेल्या अन्य तीन आरोपींच्या चौकशीतून, मोबाइल फोनच्या तपासणीतून राज्यातील अनेक छोटे-बडे सरकारी अधिकारी या टोळीच्या संपर्कात होते. त्यात पोलीस दलातील अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. या प्रकरणातील तक्रारदार व सोलापूरचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्याप्रमाणे, या टोळीने राज्य पोलीस दलातील अनेकांशी संपर्क साधून, मनाप्रमाणे बदलीचे आमिष दाखवल्याचा प्राथमिक अंदाज गुन्हे शाखेने वर्तवला आहे. मात्र, ही टोळी अधिकाऱ्यांकडे पोहोचली की, अधिकारीच बदलीचे गाऱ्हाणे घेऊन या टोळीकडे आले, तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी या टोळीच्या माध्यमातून बदली करून घेतली का की, आमिषाकडे दुर्लक्ष केले, या अंगानेही तपास होत आहे. या सर्व बाजू आरोपी, संबंधित अधिकारी यांच्या प्रत्यक्ष व तांत्रिक तपासातून अधिक स्पष्ट होणार आहेत. दुर्लक्ष केले असल्यास, टोळीचे हे सगळे अवैध उद्योग दडवून का ठेवले, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे होऊ शकते. दरम्यान, या टोळीच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
पाचवा आरोपी अटकेत
या रॅकेट प्रकरणात पुण्यातील कमलेश कानडे याला सहारा रोड येथून अटक करण्यात आली आहे. तो हिरमुखे याचा मित्र असल्याचे कॉल रेकॉर्डवरुनसमोर आले आहे. हा या प्रकरणातील पाचवा आरोपी आहे.
>वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन
या प्रकरणाच्या तपासाबाबत गुन्हे शाखेकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त के. एम.एम. प्रसन्ना, उपायुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त विनय कुलकर्णी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. तथापि, ही कारवाई झाल्यापासून गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत बैठका सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, या कारवाईचा आवाका मोठा असल्याने, तपासाची सुई बड्या सरकारी अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांपर्यंत पोहोचेल, त्याचा अंदाज आल्याने, वरिष्ठ अधिकारी पुढील तपासाच्या दृष्टीने व्यूहरचना करत आहेत.