बनावट देयकांप्रकरणी गुन्हा दाखल होणार

By admin | Published: March 2, 2017 05:26 AM2017-03-02T05:26:27+5:302017-03-02T05:26:27+5:30

‘लोकमत’ने उघड केलेल्या बनावट मालमत्ता कराच्या देयकांप्रकरणी पालिका गुन्हा दाखल करणार आहे.

They will file an FIR against them in connection with fake bills | बनावट देयकांप्रकरणी गुन्हा दाखल होणार

बनावट देयकांप्रकरणी गुन्हा दाखल होणार

Next


मीरा रोड : ‘लोकमत’ने उघड केलेल्या बनावट मालमत्ता कराच्या देयकांप्रकरणी पालिका गुन्हा दाखल करणार आहे. शिवाय वीज घेण्यासाठी बनावट करदेयकांचा वापर होत असल्याने वेबसाईटवर बिलांची खातरजमा करून वीजपुरवठा करावा, असे पत्र पालिका रिलायन्स एनर्जीला देणार असल्याचे सहायक आयुक्त तथा मुख्य कर संकलक स्वाती देशपांडे यांनी सांगितले.
मीरा भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या सरकारी तसेच खाजगी जागेत सर्रास बेकायदा बांधकामे होतात. बेकायदा बांधकामे करताना वा ती झाल्यावर त्यावर कारवाई टाळण्यासाठी अनेकवेळा न्यायालयाचा आधार घेतला जातो. त्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कराची देयके प्राधान्याने जोडली जातात. महत्त्वाचे म्हणजे अशा बेकायदा बांधकामांना रिलायन्स एनर्जीकडून झटपट वीजपुरवठा केला जातो. यामुळे साहजिकच सरकारी जागेवर होणारे अतिक्रमण तसेच बेकायदा बांधकामांना रिलायन्स एनर्जीचाही एक प्रकारे हातभार लागत असल्याचे आरोप होत आहेत.
यातूनच तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी वीजपुरवठा देण्याआधी पालिकेची ना हरकत घेणे बंधनकारक केले होते. पण त्याची काटेकोर अंमलबजावणीच झाली नाही. दरम्यान, मीरा भार्इंदर महापालिकेच्या लोगो व शिक्क्यासह राईच्या शिवनेरीनगर या सरकारी जागेवरील झोपडपट्टीतील भारतीय गहूकार व सोनिया खातून सलामुल्ला या दोन नावांची बनावट मालमत्ता कराची देयके स्थायी समिती सभापती दालनातील कर्मचारी अशोक टोपले यांच्याकडे आली हाती. त्याची खातरजामा केली असता ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ३ जानेवारीला ‘लोकमत’ने हा प्रकार उघड केला होता.
बनावट देयकांप्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सापडलेल्या बनावट देयकांबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मंजुरी घेण्यात आली आहे. तर पालिकेतील काही कर्मचारी व दलाल हे संगनमताने बनावट देयके हजार रुपयात बनवून देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
>बनावट देयकांप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत. बनावट देयकांचा वापर हा मुख्यत्वे वीजपुरवठ्यासाठी होत असल्याने रिलायन्स एनर्जीला देयकांची पालिका संकेतस्थळावर पडताळणी करण्याचे पत्र देणार आहे. - स्वाती देशपांडे,
मुख्य करनिर्धारक - संकलक
>बनावट देयके बनवणारे, त्या आधारे वीजपुरवठा घेणारे तसेच वीजपुरवणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
- रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक

Web Title: They will file an FIR against them in connection with fake bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.