रत्नागिरीतील थिबा राजवाडा झाला पर्यटकांसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:06 AM2019-05-06T05:06:40+5:302019-05-06T05:07:17+5:30
रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते.
रत्नागिरी : शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. या राजवाड्याची पहिल्या दोन टप्प्यांतील कामे पूर्ण करून राजवाडा आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे चार वर्षांनंतर पर्यटकांना हा राजवाडा आतून पाहता येणार आहे.
थिबा राजवाडा हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी मार्च, २०११ मध्ये निधी मंजूर झाला. मात्र, हा निधी मुदतपूर्व खर्च न झाल्याने पुन्हा शासन दरबारी जमा झाला होता. त्यानंतर, थिबा राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी जानेवारी, २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडून पाठविण्यात आला होता. त्या वेळी पुरातत्त्व विभागाने आर्थिक वर्षात निधी खर्च करण्याची अट शिथिल करून घेतली होती.
राजवाड्याचे पुरातन सौंदर्य अबाधित ठेवून डागडुजी करण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक पुरातत्त्व विभागातर्फे पाठविण्यात आले होते. तीन वर्षांनंतर या प्रस्तावाला (२०१४-१५)मध्ये मान्यता मिळाली होती.
या राजवाड्यात थिबा राजाचे विश्रांतीगृह, कपडे आणि थिबाने वापरलेल्या काही गोष्टी आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. दरबार हॉलसह जवळपास १८ दालने या राजवाड्यात आहेत. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्ट्या लावलेल्या असून, अर्धवर्तुळाकार खिडक्यांना रंगीबेरंगी इटालियन काचा लावलेल्या आहेत.
ब्रह्मदेशच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
ब्रह्मदेश राजघराण्यातील काही वंशज व राष्ट्राध्यक्षांनी पाच वर्षांपूर्वी रत्नागिरीत येऊन थिबा राजवाड्याची पाहणी केली होती. त्यावेळी थिबाच्या समाधीचेही त्यांनी दर्शन घेतले होते. राजवाड्याची परिस्थिती पाहून त्यांनी दुरुस्तीसाठी निधी देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शासनातर्फे दुरुस्ती सुरू असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.