आमदारांची बॅग चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे स्थानकात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:54 PM2019-06-26T12:54:42+5:302019-06-26T12:57:03+5:30
लोहमार्ग पोलिसांची कारवाई
डोंबिवली: विदर्भ एक्स्प्रेसमधून बुलढाणा येथील आमदार राहुल बोन्द्रे यांची बॅग चोरी केल्याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अहमद सैय्यद (वय 34, रा.कल्याण) याला अटक केली आहे. ही चोरीची घटना कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी घडली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या सहाय्याने चोराला अटक केली.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या तपासासाठी एक पथक तैनात करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक ए. एस. शेख त्या प्रकरणी शोध घेत होते. मंगळवारी संध्याकाळीच अहमदला ताब्यात घेण्यात आले होते. सर्व चौकशीअंती रात्री उशिराने त्याला अटक करण्यात आल्याचे बारटक्के यांनी सांगितले. आमदार बोन्द्रे हे त्यांची पत्नी वृषाली बोन्द्रे यांच्यासोबत रविवारी मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईला जाण्यासाठी बसले होते.
सोमवारी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान आमदार बोन्द्रे कल्याण स्टेशनला उतरणार होते. त्याचवेळी चोरट्याने त्यांची पत्नी वृषाली यांच्या जवळील पर्स हिसकावून पळ काढला. तसेच बोन्द्रे यांच्या जवळील महत्वाच्या कागदपत्रांची फाईलदेखील पळवली. बोन्द्रे यांनी चोरट्याचा पाठलाग करुन पर्स मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा पळ काढण्याच यशस्वी झाला. बोन्द्रे यांच्या पत्नीच्या पर्समध्ये 26 हजारांची रोकड, एटीएम कार्डसह इतरही साहित्य होते. त्याची तक्रार त्यांनी आधी मुंबई येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात केली होती. मात्र चोरीची घटना कल्याण स्थानकात घडल्याने तो गुन्हा पोलिसांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. त्यानुसार गुन्ह्याचा शोध घेतला असता चोराला अटक केली असून मुद्देमाल हस्तगत केला असल्याचेही बारटक्के म्हणाले.