चोरांच्या झटापटीत प्रवाशावर हल्ला
By admin | Published: August 24, 2016 01:53 AM2016-08-24T01:53:57+5:302016-08-24T01:53:57+5:30
आपले सामान वाचवण्यासाठी चोरांच्या टोळक्याशी एका प्रवाशांने पाठलाग करुन त्यांच्याशी झटापट केली.
मुंबई : आपले सामान वाचवण्यासाठी चोरांच्या टोळक्याशी एका प्रवाशांने पाठलाग करुन त्यांच्याशी झटापट केली. यात पाच जणांच्या एका टोळीने प्रवाशावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रवासी गंभीर जखमी झाला. घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा छडा लावला व आरोपींना अटक केली. ही घटना सोमवारी पहाटे माहीम स्थानकाजवळ घडली.
सोमवारी पहाटे ५.१0 च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या तिकीट बुंकींग जवळ (माटुंगा दिशेने) अरविंद कुमार पांडे हा झोपला होता. त्यावेळी त्याच्या डोक्याखाली सामानाने भरलेली बॅग होती. ही बॅग खेचून एका चोराने पळ काढला. बॅग घेऊन पळणाऱ्या चोराचा पांडे याने त्वरीत पाठलाग करण्यास सुरुवात केली. प्लॅटफॉर्मच्या शेवटापर्यंत गेल्यानंतर चोराने ट्रॅकच्या दिशेने धाव घेतली. यात पांडेने पाठलाग करुन चोराला पकडले आणि त्याच्याशी झटापट सुरु केली. झटापट सुरु असतानाच चोराचे आणखी चार साथिदार दाखल झाले आणि त्यांनी पांडेला मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने धारदार शस्त्राने पांडेच्या पोटावर वार केले व तेथून पळ काढला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचवेळी रेल्वे ट्रॅकवर कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे पोलिसाने जखमी पांडेला पाहिले आणि अन्य पोलिसांना याची माहिती देत सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सविस्तर माहिती घेतली असता स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली व वेगाने तपास करण्यात आला. लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक व पश्चिम रेल्वे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे विभागाचे सह पोलीस आयुक्त केंद्रे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक पवार व धनवटे यांनी यशस्वीरित्या तपास केला. (प्रतिनिधी)