दुष्काळाच्या झळांनी तरुण बनला चोर

By admin | Published: May 24, 2016 06:18 AM2016-05-24T06:18:04+5:302016-05-24T06:18:04+5:30

वडील वारलेले... म्हातारी आई... लहान बहीण... परिस्थिती हलाखीची... गाव दुष्काळामुळे ओसाड झालेलं... रोजगार नाही की उत्पन्नाचं साधन नाही... तो पुण्याची वाट धरतो... नोकरी शोधतो...

Thieves became young by drought | दुष्काळाच्या झळांनी तरुण बनला चोर

दुष्काळाच्या झळांनी तरुण बनला चोर

Next

पुणे : वडील वारलेले... म्हातारी आई... लहान बहीण... परिस्थिती हलाखीची... गाव दुष्काळामुळे ओसाड झालेलं... रोजगार नाही की उत्पन्नाचं साधन नाही... तो पुण्याची वाट धरतो... नोकरी शोधतो... हाती मात्र निराशा पडते... पोटाची आग स्वस्थ बसू देत नाही... इच्छा नसताना तो वाहनचोरी करू लागतो... चोरलेली वाहने विकण्याच्या आधीच तो पोलिसांच्या ताब्यात सापडला... दुर्दैवाच्या फेऱ्याने त्याला थेट गजाआड नेले.
फरासखाना पोलिसांनी नुकतीच वाहनचोरी प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. अण्णा माणिक चव्हाण (वय २४, रा. गुंजेवाडी, आंबेजवळगे, जि. उस्मानाबाद) हा तरुण गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात नोकरीच्या शोधात फिरत होता. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. आईवडील गावात शेतमजुरी करून कुटुंब जगवत होते. त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले. बारावीपर्यंत शिकलेल्या अण्णा हा वडिलांनंतरचा घरातला पुरुष. त्याने नातेवाईक त्यांच्याकडे पाहायला तयार नव्हते. दुष्काळामुळे शेताची कामे बंद होती. त्याला गावाकडे काम मिळेना. त्याच्या गावातले काही तरुण पुण्यात मजुरी करीत होते. त्यांच्या ओळखीने अण्णा पुण्यात आला.
वडगाव धायरीमध्ये भाड्याने राहत असताना नोकरी शोधू लागला. एका फॅक्टरीत काम मिळाले; परंतु काही दिवसांत ते कामही सुटले. आई आणि बहीण त्याच्याकडे पुण्यात आली होती.
मराठवाड्यात पाण्याचा आणि शहरात माणुसकीचा दुष्काळ तो अनुभवत होता. शेवटी चोऱ्या करण्याचा त्याने निर्णय घेतला. बुधवार पेठेतील तापकीर गल्लीमधून त्याने एक दुचाकी चोरली. ही चोरी उघडकीस न आल्याने त्याने दुसरी मग तिसरी चोरी केली. चोरलेल्या तीन दुचाकी विक्री करून येणारे पैसे घरी पाठवावेत. त्यातून रेशन भरावे, बहिणीला आईला कपडे घ्यावेत, असा त्याचा विचार होता. परंतु अजूनही दुर्दैवाने त्याची पाठ सोडलेली नव्हती. चोरीच्या दुचाकीवर बसून जात असताना पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याची नंबरप्लेट बनावट असल्याचे हेरले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने वाहने चोरल्याची कबुली दिली. त्याला भेटल्यावर चोरी का करतोस, हा प्रश्न केल्यावर तो नि:शब्द झाला. डोळ्यातलं पाणी त्याच्या असहायतेची साक्ष देत होतं. आई आणि बहिणीच्या काळजीने हाताला काम शोधता शोधता नाइलाजाने चोरीकडे वळलेल्या अण्णाला पोलीस कोठडीत जावे लागले.

मोलमजुरी करून दोन पैसे जमवण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु, घर भागेना म्हटल्यावर आई आणि बहीण परत गावी गेली. परंतु त्यांना उदरनिवार्हासाठी पैसे पाठवावेच लागत. काम नाही, रोजगार नाही अशा स्थितीत काय करावे हे सुचत नव्हते.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे त्याने घेतला वाहनचोरीचा निर्णय

चोरीच्या दुचाकीवर बसून जात असताना पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याची नंबरप्लेट बनावट असल्याचे हेरले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने वाहने चोरल्याची कबुली दिली.

Web Title: Thieves became young by drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.