चोरांची एवढी हिंमत? थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांचाच मोबाईल पळविण्याची, ते ही बीडमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:01 IST2025-04-05T16:00:48+5:302025-04-05T16:01:07+5:30
Yogesh Kadam Mobile Lost: आता मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार खुद्द गृहराज्यमंत्र्यांना द्यावी लागावी, ही म्हणजे गृहखात्याची मोठी नामुष्कीच आहे, नाही का.

चोरांची एवढी हिंमत? थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांचाच मोबाईल पळविण्याची, ते ही बीडमध्ये...
राज्यात कायदा व सुव्यवस्थेच किती धिंधवडे निघाले आहेत, हे शुक्रवारी घडलेल्या घटनेवरून लक्षात येईल. कारण दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नव्हे गृहमंत्रालय ज्यांच्या ताब्यात आहे, ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेला आहे आणि दुसरी तिसरीकडे नाही तर बीडमध्ये ही घटना घडली आहे.
आता मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार खुद्द गृहराज्यमंत्र्यांना द्यावी लागावी, ही म्हणजे गृहखात्याची मोठी नामुष्कीच आहे, नाही का. कदमांचा मोबाईल पोलीस अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोर चोरीला गेला आहे. म्हणजे दिवसाढवळ्या चोरी होते हे ऐकले होते पण पोलिसांच्या नाकासमोरून, माध्यमांचे कॅमेरे असताना देखील त्यांचा मोबाईल लंपास होतोय म्हणजे तेथील चोरटे किती हातचलाखीने हे काम करतात हे समोर येत आहे.
योगेश कदम यांनी केज पोलिसांत मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. कदम हे बीड दौऱ्यावर असताना मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या सांत्वनासाठी गेले होते. यावेळी माध्यमे देखील समोर होती. तेथून कदम यांचा मोबाईल पळविण्यात आला आहे. हे समजताच शोधाशोध सुरु झाली, परंतू कुठेच सापडत नसल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
On Patrol
— Kitsap Sheriff (@KitsapCoSheriff) April 1, 2025
Deputies recover an abducted chicken. pic.twitter.com/t7Z5ado8ag
दरम्यान, विरोधकांनी कदमांचा मोबाईल चोरीला गेल्यावरून टीका सुरु करताच आता कदमांच्या कार्यालयाकडून खुलासा आला आहे. यामध्ये जो हरवलेला मोबाईल आहे तो कदमांचा नसून त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल असल्याचे म्हटले आहे. आता कदमांच्या उपस्थितीत, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कदमांच्या जवळच्याचा मोबाईल चोरीला गेला तरी देखील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.