राज्यात चोऱ्यामाऱ्यांना ऊत
By admin | Published: May 24, 2017 02:37 AM2017-05-24T02:37:46+5:302017-05-24T02:37:46+5:30
राज्यातील दरोडे, मारहाण करून चोरी करण्याच्या गुन्ह्यांचा कल आणि त्यांचे विश्लेषण पाहता असे गुन्हे रात्री ८ ते १२ दरम्यान सर्वाधिक घडत असल्याचे दिसून आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील दरोडे, मारहाण करून चोरी करण्याच्या गुन्ह्यांचा कल आणि त्यांचे विश्लेषण पाहता असे गुन्हे रात्री ८ ते १२ दरम्यान सर्वाधिक घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे प्रमाण २४ तासांमध्ये याच वेळेत ४१ टक्के आहे. त्यातही चोऱ्या २४ तास सातत्याने होत असून, मंगळवार हा त्यादृष्टीने नागरिकांसाठी घातवार ठरतो आहे.
दरोडेखोर दुपारी १२ ते ४ किंवा रात्री ८ ते १२ याच वेळेच्या मर्यादेत गुन्हे करताना दिसून आले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.
दरोडे आणि जबरी चोरीचे प्रमाण दुपारी १२ ते ४ या वेळेत २२ टक्के झाले आहे. त्यानंतर सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत या गुन्ह्यांचे प्रमाण समान, ११ टक्के असून रात्री १२ ते पहाटे ४ दरम्यान ७ टक्के गुन्हे होत आहेत.
रात्री ८ ते १२ दरम्यान जबरी चोरीचे ४७ आणि दरोड्याचे ५० गुन्हे पोलिसांकडे दाखल झाले. दुपारी १२ ते ४ दरम्यान जबरी चोरीचे २६ गुन्हे दाखल होते.
या वेळेत दरोडा पडल्याची नोंद उपलब्ध नाही. सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यानही जबरी चोरीचे प्रत्येकी १३ गुन्हे दाखल असून दरोड्यांचे प्रमाण शून्य आहे. रात्री १२ ते पहाटे ४ दरम्यान मारहाण करून चोरी केल्याचे १० गुन्हे दाखल झाले. पहाटे ४ ते ८ दरम्यान याच प्रकारचे ८ गुन्हे दाखल झाले.
९ ते १५ एप्रिल दरम्यानच्या आठवड्यामध्ये ६ दरोडे आणि ११७ चोरीचे गुन्हे दाखल झाले. जबरी चोरीच्या ११७ गुन्ह्यांपैकी ४३ गुन्हे (२९ टक्के) सोनसाखळी चोरीचे आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने दरोडे आणि मारहाण करून चोऱ्या होण्याचे वारानुसार विश्लेषण केले असता सर्वाधिक २१ टक्के (१ दरोडा २५ चोऱ्या) गुन्हे बुधवारी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर रविवारी १८ टक्के (२ दरोडे, २० चोऱ्या), सोमवारी १६ टक्के (१ दरोडा, २० चोऱ्या), मंगळवारी १४ टक्के (० दरोडा, १७ चोऱ्या), शनिवार व गुरुवारी प्रत्येकी ११ टक्के (१ दरोडा, १२ चोऱ्या) आणि शुक्रवारी ९ टक्के (१ दरोडा, १० चोऱ्या) असे प्रमाण आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अनेक जिल्ह्यांकडून दरोडे आणि जबरी चोरीसह विविध गुन्ह्यांचा तपशील मागविला होता. ९ ते १५ एप्रिलदरम्यान तसेच त्याआधीच्या ५ आठवड्यांच्या जबरी चोरी आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांचा एकत्रित अभ्यास केला असता सर्वाधिक दरोडे रात्री ८ ते १२ या वेळेत आणि सर्वाधिक जबरी चोरीचे गुन्हेही याच वेळेत झाले आहेत. ५ आठवड्यांच्या विश्लेषणामध्ये सर्वाधिक दरोडे रविवार आणि सोमवारी पडल्याचे दिसून येते, तर सर्वाधिक चोरीचे गुन्हे मंगळवारी झाले आहेत.