चोर-पोलीस खेळ सुरूच!
By Admin | Published: January 11, 2016 01:33 AM2016-01-11T01:33:57+5:302016-01-11T01:33:57+5:30
चोरी, घरफोडीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असल्या, तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मात्र आले नाही.
पिंपरी : चोरी, घरफोडीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असल्या, तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मात्र आले नाही. हिंजवडीत सराफा व्यापाऱ्याची हिऱ्यांची बॅग पळविल्याचा प्रकार, एचडीबी फायनान्समधील ७० तोळे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना, चिखलीतील भरदिवसा झालेली घरफोडी या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या, तरीही पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य
होत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त
होत आहे.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी महिला स्वच्छतागृहाची खिडकी उचकटून एचडीबी फायनान्समधून सुमारे साडेअकरा लाखांचे ७० तोळे सोने चोरून नेले. मुंबई-पुणे महामार्गालगतच ही इमारत असून, येथील काही दुकाने मध्यरात्री १२पर्यंत सुरू असतात. एचडीबी फायनान्ससह इतर कंपन्यांच्या फायनान्सची कार्यालये या ठिकाणी आहेत. सुरक्षिततेसाठी येथील बहुतांश दुकानदारांनी सीसीटीव्ही यंत्रणाही बसविली आहे, तर काही दुकानदारांनी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवली आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या या परिसरात एचडीबी फायनान्समधील चोरीच्या प्रकारामुळे शहरातील इतरही बँकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेसंदर्भात सीसीटीव्ही असून, फुटेज मिळूनही पोलिसांना चोरट्यांचा छडा लावण्यात विलंब येत आहे. एचडीबी फायनान्स चोरीप्रकरणी पोलिसांनी फुटेजनुसार संशयित म्हणून काही सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले.
चौकशीनंतर सोडून दिले गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.अशाच प्रकारे हिंजवडीमधील सराफाची हिऱ्यांची बॅग चोरट्याने लंपास केल्याची
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असूनही, चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सुरक्षारक्षकालाच मारहाण करून चोरट्यांनी मुद्देमाल पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. (प्रतिनिधी)मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात दिवसा व रात्री मिळून एकूण १९१ घरफोड्या झाल्या. यामध्ये फक्त ६३ घटना उघडकीस आल्या. दरम्यान, दिवसा झालेल्या घरफोड्यांची संख्या ४६ होती. यामध्ये १० घटनांचा छडा लावण्यात पोलीस अयशस्वी झाले आहेत.
बहुतांश व्यावसायिकांकडून सीसीटीव्ही बसविण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र, एचडीबी फायनान्स, सराफाची बॅग चोरीला गेल्याची घटना, यासह हिंजवडी, तळवडे येथे दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटना सीसीटीव्हीत कैद होऊनही चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना हे फुटेज कामी आलेले नाही. गेल्या वर्षी घडलेल्या काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होऊनही अद्याप त्या घटना उघडकीस येऊ शकलेल्या नाहीत.