भरदुपारी चोरट्यांनी केला महिलेचा गळा चिरून खून
By admin | Published: May 26, 2016 06:51 PM2016-05-26T18:51:54+5:302016-05-26T18:51:54+5:30
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सोने पळविताना आरडाओरडा केलेल्या महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केला
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 26- उदगीर येथे गुरुवारी भर दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सोने पळविताना आरडाओरडा केलेल्या महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केला. चोरट्यांच्या या हल्ल्यात मयत महिलेचा १५ वर्षाचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे़ प्रणिता प्रशांत पेन्सलवार (वय ४४) असे मयत महिलेचे नाव आहे.
उदगीर शहरातील शेल्लाळ रोडवरील येथील प्रशांत पेन्सलवार यांच्या घरी गुरुवारी दुपारी एकच्या त्यांची पत्नी प्रणिता व मुलगा सोहम (१५) हे दोघेच होते़ यावेळी तीन अज्ञात युवकांनी ‘सावकारांनी (मयत महिलेच्या पतीने) एसी दुरुस्त करण्यास सांगितले आहे’, असे प्रणिता पेन्सलवार यांना सांगितले़ त्यामुळे त्यांनी तिघांना एसी दाखविली़ एसी पाहण्याचा बहाणा करुन ते तपास असताना त्यांनी पाणी मागितले. १५ वर्षीय सोहम पाणी आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला असता या तिघांनी प्रणिता यांना धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिणे ओरबाडले़ घाबरलेल्या प्रणिता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ तेव्हा तिघांनी तीक्ष्ण हत्याराने त्यांचा गळा चिरला आणि पलायन करण्यास सुरुवात केली़ दरम्यान, आईचा आवाज ऐकून सोहम धावत येत असताना त्याच्याही हातावर तिघांनी हातातील हत्यारांनी वार केला़ त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्याची आई प्रणिता यांना या हल्ल्यात आवाजही करता आला नाही. त्यांचा गळा इतक्या निर्दयी पध्दतीने चिरला गेला होता की शरीरापासून शीर वेगळे होता होता वाचले होते.
भर दुपारी पेन्सलवार यांच्या कुटुंबातील आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावून आली़ तोपर्यंत तिघेही अज्ञात चोर पसार झाले होते़ घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कबाडे यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे़
पेन्सलवार हे मोठे किराणा व्यापारी ...
उदगिरात प्रशांत पेन्सलवार हे प्रसिध्द किराणा व्यापारी आहेत. त्यांचे मुख्य मार्केटमध्ये दुकान आहे. त्यांचे उदगिरात काही वर्षांपासून दुकान आहे. त्यामुळे लक्ष ठेवून चोरट्यांनी घरावर दरोडा टाकण्याची शक्यता पोसिल वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.