पोलिसांनी डोंगर पिंजूनही सापडले नाहीत चोर
By Admin | Published: February 27, 2017 12:12 AM2017-02-27T00:12:26+5:302017-02-27T00:12:26+5:30
मावळ तालुक्यात चोरांबाबतच्या उठणाऱ्या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
वडगाव मावळ : संपूर्ण मावळ तालुक्यात चोरांबाबतच्या उठणाऱ्या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या काल्पनिक चोरांना शोधण्याची मोहीम वडगाव पोलिसांनी राबविली. मात्र, चोर सापडले नाहीत.
चोर या गावातून त्या गावात गेला. आता येथे होता. पत्र्यावरून उड्या मारून लगेच दुसऱ्या गावात गेला. अंगाला काळे आॅईल लावले आहे. खूप मोठी टोळी आहे. घरातील लोकांना प्रचंड मारहाण करतात. सोने चोरतात, पण कोणाला सापडत नाहीत किंवा आतापर्यंत कोणीही त्यांना पाहिले नाही अशा वावड्या उठत आहेत. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या काल्पनिक चोरांना शोधण्यासाठी वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काळे व त्यांच्या टीमने वडगाव परिसरातील मोहितेवाडी ते डोंगरवाडी असा संपूर्ण डोंगर पिंजून काढला.पण चोर सापडले नाहीत. त्यामुळे रात्री नऊपासून पहाटे सहापर्यंत शहरी व ग्रामीण भागात फिरणारे चोर दिवसा डोंगरात पण सापडले नाहीत, तर मग राहतात कुठे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चोर आल्याच्या अफवांना ऊत येऊन त्या सर्वदूर पसरत आहेत. चोरी झाल्याचे किंवा या काळ्या आॅईलवाल्या चोराने चोरी केल्याचे कोठेही निष्पन्न झाले नाही. माझ्या घरात चोरी झाली, अशी साधी तक्रारदेखील कोणी नोंदवलेली नाही.(वार्ताहर)
>मी आणि माझ्या टीमने मोहितेवाडी ते डोंगरवाडी असा संपूर्ण डोंगर पिंजून काढला. परंतु या ठिकाणी चोर असल्याचा कोणत्याही खाणाखुणा सापडल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यात चोरटे आहेत या केवळ अफवा असून नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये. काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील मजकुराची खात्री करावी. चोरट्यांविषयीचा खोटा मजकूर पसरवू नये.
- प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ ठाणे.